लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलिसांकरिता विविध संस्थांनी संयुक्तरीत्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी फुप्फुसाची कार्यक्षमता तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात आली. विशेषत्वाने प्रदूषणाबरोबरच स्मार्टफोन व संगणक यांच्या वाढत्या वापराचा परिणाम अनेकांच्या दृष्टीवर होत असल्याचे यावेळी दिसून आले. वाहतूक पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना सतत प्रदूषणाचा सामना करावा लागतो. वाहनांचा धूर, धूळ याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत असतो. यामुळे अनेकांना प्रकृतीचे गंभीर आजार उद्भवतात. मात्र त्यानंतरही किरकोळ त्रास समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे वाहतूक पोलिसांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांच्याकरिता आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिक आय केअर, रोटरी क्लब आॅफ खारघर व नवीन पनवेल, क्रिसल तसेच ओम गगनगिरी हॉस्पिटल यांनी संयुक्तरीत्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी वाहतूक पोलिसांच्या प्रत्येक पोलीस ठाणेअंतर्गत उपक्र म राबवून तिथल्या वाहतूक पोलिसांची तपासणी केली. त्यामध्ये डोळे तपासणी व फुप्फुसाची कार्यक्षमता तपासणी मुख्यत्वाने करण्यात आली. यावेळी बहुतांश पोलिसांवर धूळ व प्रदूषणाचा झालेला परिणाम दिसून आला. त्याशिवाय स्मार्टफोन व संगणकाचा निष्काळजीपणे होणारा वापर देखील अनेकांच्या दृष्टीवर परिणामकारक ठरत असल्याचे आढळून आले. संगणक वापरताना डोळ्यांपासून त्याची स्क्र ीन काही अंतरावर व योग्य उंचीवर असणे गरजेचे असतानाही तसे होत नाही. रात्रीच्या वेळी सतत मोबाइल वापरल्याने देखील डोळ्यावर ताण पडून अनेकांची नजर कमी झालेली आहे. या सर्व प्रकारामुळे अनेकांना डोळ्याची खाज होणे, डोळे कोरडे पडणे असे त्रास दिसून आल्याचे डॉ. प्रशांत थोरात यांनी सांगितले. त्या सर्वांवर मोफत उपचार करून आवश्यक त्यांना चष्मे वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय डोळ्यांची काळजी कशी घ्यावी व डोळ्यांचे व्यायाम याचीही माहिती त्यांना देण्यात आली.
पोलिसांची आरोग्य तपासणी
By admin | Published: May 09, 2017 1:33 AM