बांगलादेशींविरोधात पोलिसांची विशेष शोधमोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:10 AM2018-08-29T05:10:49+5:302018-08-29T05:11:28+5:30
मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : बांगलादेशमध्ये मोबाइलवरून संपर्क सुरू असल्याचे उघड; नेरुळसह कळंबोलीत धाड
नामदेव मोरे
नवी मुंबई : बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आय विंगने कळंबोली व नेरुळमध्ये धाड टाकून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. अटक केलेल्या पाच महिला मोलकरीण म्हणून काम करत असून, पुरुष बांधकाम व्यवसायामध्ये रोजंदारीवर काम करत आहेत. या सर्वांचा मोबाइलवरून बांगलादेशमध्ये राहणाऱ्यांबरोबर संपर्क असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी)या दहशतवादी संघटनेने भारतात जाळे विणण्यास सुुरुवात केल्याचे निदर्शनास आल्यापासून पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यासाठी आय विंग सुरू केली असून, त्या माध्यमातून घुसखोरांचा शोध सुरू केला आहे. नेरुळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये बांगलादेशींनी आश्रय घेतला असल्याची माहिती आय शाखेच्या अधिकाºयांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे २४ आॅगस्टला नेरुळमध्ये धाड टाकण्यात आली. सेक्टर-२३ दारावे गावामधील सदानंद म्हात्रे चाळ व सारसोळे गावातील राजाराम निवास येथून तीन पुरुष व एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिघेही बांधकाम मजूर म्हणून काम करत असून, महिला मोलकरीण म्हणून कार्यरत आहे.
आरोपींकडे जिओ व आयडियाचे सिम कार्ड व मोबाइल फोन आढळून आला आहे. मोबाइलचा तपशील चेक केला असता, बांगलादेशमधील १२ जणांशी त्यांच्या मोबाइलवर वारंवार संभाषण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कळंबोलीमधील केएल टाइप वसाहतीमध्येही बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करत असल्याची माहिती आय शाखेच्या अधिकाºयांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे २५ आॅगस्टला दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. एकूण पाच जणांना अटक केली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. महिला मोलकरीण म्हणून कळंबोली परिसरामध्ये काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडे वोडाफोन व आयडिया कंपनीचे सिम कार्ड व मोबाइल फोन आढळून आला आहे. त्यांनी बांगलादेशमधील २५ जणांशी नियमित मोबाइलवरून संपर्क साधल्याचेही तपासात उघड झाले आहे.
कळंबोलीत सापडलेले बांगलादेशी
शोरीपूर आलुम खान
गाव -लखोटीआ, जिल्हा खुलना
रेश्मा शोरीपूर खान
गाव - लखोटीआ, जिल्हा खुलना
करिश्मा सद्दारअली सिद्धिकी
गाव - भाडुखली, जिल्हा सातखिरा
माबिया रौफ शेख
गाव - धिंगोरीया, जिल्हा नोडाईल
मिलन आशिद मुल्ला
हिदीया, जिल्हा नोडाईल
सिम कार्ड मिळालेच कसे
कळंबोली व नेरुळमध्ये सापडलेल्या बांगलादेशींकडे आयडिया, जिओ, वोडाफोन कंपनीची सिम कार्ड आढळून आली आहेत. सिम कार्ड देताना संबंधितांचा रहिवासी पत्ता, आधार कार्ड व इतर पुरावे देणे आवश्यक असते. बांगलादेशींकडे हे पुरावे कोठून आले व त्यांना सिम कार्ड कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेरुळमध्ये सापडलेले बांगलादेशी
खुर्शीद उमरअली शेख
गाव -आटगरा, जिल्हा जैसोर
मोहम्मदअली लुफ्तर बिश्वास,
गाव - मिर्झापूर, जिल्हा नोडाईल
वहिदुल रसूल खान,
गाव - रतोंदिया, जिल्हा नोडाईल
शीला शहाजन मुल्ला
गाव - छोटा कालीचा
विदेशींना आश्रय
नेरुळ परिसरातील सारसोळे व दारावे गावामध्ये व कळंबोलीमधील सिडको विकसित कॉलनीमध्ये बांगलादेशींनी घरे भाडेतत्त्वावर घेतल्याचे निदर्शनास आले आहे. घरमालकांनी त्यांच्याविषयी माहिती व पोलीस स्टेशनचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे; परंतु जादा भाडे मिळण्याच्या आशेने नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. घरकाम करण्यासाठीही कमी पैशांत मोलकरीण उपलब्ध होत असल्यामुळे बांगलादेशींना आश्रय देण्याचे प्रकार वाढले आहेत.
च्अटक केलेल्या पाच महिला मोलकरीण म्हणून काम करत आहेत.
च्पुरुष बांधकाम व्यवसायामध्ये रोजंदारीवर काम करत आहेत.
च्कळंबोली व नेरुळमध्ये कारवाई
मार्चमध्ये सापडले होते संशयित अतिरेकी
नवी मुंबई एटीएसच्या पथकाने १३ मार्चला पनवेलमधील जुई गावामध्ये धाड टाकून अन्सारुल्ला बांगला टीम या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून पाच बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडेही आधार व पॅन कार्ड आढळून आले होते. ७०० रुपयांमध्ये पॅन कार्ड काढून देण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले होते.