खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांची नजर
By admin | Published: July 12, 2016 02:49 AM2016-07-12T02:49:37+5:302016-07-12T02:49:37+5:30
मुंबईला जोडल्या जाणाऱ्या मार्गांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे.
नवी मुंबई : मुंबईला जोडल्या जाणाऱ्या मार्गांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे. इतर काही पुलांसह या पुलाला दहशतवाद्यांच्या कारवाईचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधीची माहिती राज्य गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागल्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिला नाही.
देशात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांकडून यापुढे मुंबईला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशा स्वरूपाचे गोपनीय संभाषण गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानुसार मुंबईत संभाव्य धोका असलेल्या ठिकाणांसह वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे. याकरिता मागील पाच दिवसांपासून वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून पुलालगत घडणाऱ्या प्रत्येक गैर हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी हा पूल त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेचा विषय ठरलेला आहे. अशातच त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा संभाव्य धोका असल्याच्या शक्यतेवरून पुन्हा वाशी खाडीपूल चर्चेचा भाग बनला आहे.
सायन-पनवेल मार्गावर असलेल्या या पूलावरून प्रतिदिन शेकडो वाहने त्यावरून मुंबईत ये-जा करतात. शिवाय लगतच रेल्वे पूल देखील आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या रडारवर हा पूल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नवी मुंबई पोलिसांनी मात्र पुलाला धोका असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पुलाच्या सुरक्षेला धोका असल्याची कसलीही सूचना गुप्तचर यंत्रणेकडून आलेली नाही. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चा अफवा आहेत. तसेच पुलालगतचा बंदोबस्त हा नियमित असल्याचे विशेष शाखा उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)