पाळणाघरांसह वृद्धाश्रमांवर पोलिसांची नजर
By Admin | Published: January 9, 2017 06:41 AM2017-01-09T06:41:15+5:302017-01-09T06:41:15+5:30
खारघर येथील पाळणाघरातील प्रकारानंतर आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच पाळणाघर, वृद्धाश्रम तसेच हॉस्टेल्स यांना पोलिसांकडे नोंदणी
नवी मुंबई : खारघर येथील पाळणाघरातील प्रकारानंतर आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच पाळणाघर, वृद्धाश्रम तसेच हॉस्टेल्स यांना पोलिसांकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील १८३ केंद्रांची नोंदणी झालेली असून, त्या सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची सक्त ताकीद पोलिसांतर्फे संस्थाचालकांना देण्यात आलेली आहे. यामुळे त्या ठिकाणच्या गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
खारघर येथील ‘पूर्वा डे केअर’ या पाळणाघरात चिमुकल्याला अमानुषपणे मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून पालकांनी डे केअर विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती; परंतु पोलिसांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्यानंतर पालकांनी मिळवलेल्या त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या चित्रिकरणातून संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक केलेली आहे. ज्या महिलेने मारहाण केलेली ती मनोरुग्ण असल्याचेही भासवण्याचा प्रयत्न त्या वेळी कारवाई टाळण्याच्या उद्देशाने झाला होता.
दरम्यान, पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचेही निलंबन करण्यात आले आहे. मात्र, भविष्यात असाच प्रकार पुन्हा इतर कोणत्या डे केअरमध्ये घडू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. त्याकरिता आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व पाळणाघरांना पोलिसांकडे नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे.
शिवाय, त्या ठिकाणच्या कामगारांची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलिसांकडे संग्रहित राहणार आहे. अशातच ठाणे येथील वृद्धाश्रमातील प्रकरणानंतर पाळणाघरांसह वृद्धाश्रम, पुरुष व महिला वसतिगृहे, विद्यार्थी वसतिगृहे यांनाही नोंदणी सक्तीची केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.
सद्यस्थितीला १८३ केंद्रांची नोंदणी झालेली असून त्यांना सीसीटीव्ही बसवण्याच्याही सूचना केलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी सर्वाधिक संस्था परिमंडळ २ मधील पनवेल व लगतच्या परिसरात चालत आहेत.
पोलिसांनी केलेल्या संपूर्ण सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. यानंतरही नोंदणी अथवा सीसीटीव्ही बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा आयुक्त नगराळे यांनी दिला आहे.
एखाद्या पालकाला संबंधित पाळणाघरातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण हवे असल्यास, ते उपलब्ध करून देण्याची यंत्रणाही उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या आहेत. यामुळे खारघर येथील डे केअरमधील प्रकाराची पुनरावृत्ती शहरात इतर कोणत्या ठिकाणी होणार नाही, असा विश्वास नवी मुंबई पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)