तरुणांच्या वर्तणुकीवर पोलिसांची नजर; अमली पदार्थांची विक्री व सेवन विरोधात मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:20 AM2019-10-06T02:20:13+5:302019-10-06T02:20:22+5:30
नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत.
नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असून, ते रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यानुसार मागील नऊ महिन्यांत पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थ विक्री व सेवनाच्या ९६ कारवाया करण्यात आल्या आहेत. तर शाळा-महाविद्यालयाबाहेर पोलिसांकडून तरुणांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
नवी मुंबईतील अमली पदार्थ विक्रीचे जाळे खोलवर पसरत असल्याने बेरोजगारांसह, रिक्षाचालक व महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे शहरात गांजापाठोपाठ एमडी पावडर व ब्राउन शुगरचीही मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. यामुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या तरुणाईचे भवितव्य वाचवण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु स्थानिक पातळीवर चालणारे गर्दुल्ल्यांचे अड्डे माहीत असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही परिमंडळमध्ये प्रत्येकी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मागील दोन महिन्यांत ३४ कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५ कारवाई परिमंडळ-१ मध्ये आहेत. उर्वरित नऊ कारवाई या परिमंडळ-२ मधील आहेत. त्याशिवाय गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सात कारवाई करण्यात आलेल्या आहेत. या संपूर्ण कारवार्इंमधून १२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आयुक्तालयात ९६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी सहायक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रानुसार वाशी विभागात ४७, तुर्भे विभागात २८, पनवेल विभागात २० तर पोर्ट विभागात एक कारवाई झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कारवाई झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अमली पदार्थविक्रेत्यांचे जाळे मोडीत निघत नसल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थांचे हे जाळे मोडीत काढण्यासाठी प्रत्येक गुन्ह्याचा खोलवर तपास केला जात असल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाबाहेर पोलिसांकडून पाळत ठेवून विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.