नवी मुंबई : कामानिमित्ताने एपीएमसीमध्ये आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघा व्यक्तींनी ते पोलीस असल्याचे सांगून खोट्या गुन्ह्यात अडकवायची भीती दाखवून अपहरण केले. त्यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटून त्यांना नगरमध्ये सोडून देण्यात आले होते.ॠ षीकेश धसाळ यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. धसाळ हे व्यापारी असून जालनाचे राहणारे आहेत. व्यावसायिक कामानिमित्ताने ते दोघा साथीदारांसह खासगी बसने एपीएमसी आवारात आले होते. काम उरकल्यानंतर ते परत जालनाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच खासगी कारमधून आलेल्या तीन व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. त्यांनी पोलीस असल्याचे सांगत कारमध्ये बसवले. या कारवरही पोलीस लिहिण्यात आलेले होते. यानंतर त्यांना शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून अहमदनगरच्या दिशेने नेले. त्या ठिकाणी धसाळ यांच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांना अज्ञात ठिकाणी सोडून पळ काढला. या घटनेनंतर धसाळ यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
एपीएमसीत तोतया पोलिसांनी लुटले
By admin | Published: May 01, 2017 6:50 AM