एमआयडीसीत पोलिसांचे मिशन ऑल आउट, गुन्हेगारांची धरपकड
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 17, 2024 06:16 PM2024-03-17T18:16:30+5:302024-03-17T18:17:15+5:30
तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतल्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट ऑपरेशन केले.
नवी मुंबई : अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट राबवले. त्यामध्ये परिसरात केलेल्या झाडाझडती मध्ये तलबार बाळगणाऱ्या दोघांना अटक केली असून एकाकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतल्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट ऑपरेशन केले. उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी हि मोहीम राबवली. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयाचे राखीव पोलिसबळ देण्यात आले होते. त्यांनी शनिवारी रात्री परिसरात नाकाबंदी करून अंतर्गतच्या भागात झाडाझडती घेतली. यामध्ये राहुल दांडगे (४१) य याच्याकडे १ लाख २० हजार रुपये किमतीचा १० किलो २०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. तर दोघांकडे प्रत्येकी एक अशा दोन तलवारी मिळून आल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय साडेसात हजाराची देशी दारू मिळून आली आहे. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान संशयित ७८ घरे व २७ आस्थापनांची झाडाझडती केली. त्यामध्ये दोन घुसखोर बांग्लादेशी देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. शिवाय हद्दपार केले असतानाही परिसरात वावरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीवरील गुंडा, हिस्ट्रीशिटर यांची देखील झाडाझडती घेऊन ते जागेवर आहेत का हे पडताळण्यात आले. त्यामध्ये पाहिजे असलेले दोन आरोपी देखील मिळून आले. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, नशा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली.
वाहन चालकांवर कारवाई
कोम्बिंग ऑपरेशनच्या अनुशंघाने तुर्भे एमआयडीसी पोलिस व वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरित्या दोन ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्याठिकाणी संशयित वाहनांची झाडाझडती करून कागदपत्रे देखील तपासण्यात आली. यामध्ये १६४ वाहनांच्या झाडाझडतीत १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.