नवी मुंबईत पोलिसांनाही भेडसावत आहे पार्किंगचा प्रश्न; रस्त्यावर वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:38 AM2021-03-09T01:38:39+5:302021-03-09T01:39:00+5:30
वाहनतळाची सोयच नाही; आयुक्तालयाबाहेरदेखील रस्त्यावर पार्किंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच पोलिसांनादेखील पार्किंगची समस्या भेडसावत आहे. काही पोलीस ठाणी वगळता इतर ठिकाणी वाहनतळ नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. यामुळेच पोलीस आयुक्तालयाबाहेरदेखील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना सिडकोला अनेक बाबींच्या नियोजनाचा विसर पडला आहे. त्यात पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विभागनिहाय पोलीस ठाण्याची गरज असतानाही त्याचा विचार केला गेला नाही. यामुळे सध्या नवी मुंबईत भाडोत्री जागेत किंवा अडगळीच्या ठिकाणी पोलीस ठाण्याचा कार्यभार चालत असल्याचे पाहायला मिळते. अशातच पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची व पोलिसांची वाहने लावण्यासाठीदेखील जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. नवी मुंबईत सध्या दहा पोलीस ठाण्यांपैकी मागील काही वर्षात नव्याने बांधकाम झालेली चार पोलीस ठाणी वगळता इतर सहाही ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या आहे. शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसांचीदेखील हीच परिस्थिती आहे. मिळेल त्या जागेत पोलीस ठाणे चालवावे लागत असून त्याच आवारात स्वतःची खासगी तसेच शासकीय वाहने उभी करावी लागत आहेत. नवी मुंबईत सद्यस्थितीला वाहतूक व शहर पोलीस मिळून १६००च्या जवळपास अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिकांकडे दुचाकी तर काहींकडे चारचाकी वाहने आहेत. त्यांना ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच उभी करून ठेवावी लागत आहेत. यामुळे काही ठिकाणी पदपथ व रस्ते वाहनतळ बनल्याचेही चित्र पाहायला मिळते. अनेकदा वाहतूक पोलिसांकडून शहरातील रस्त्यावरील वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र अशा ठिकाणांवर कारवाई का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांचीही वाहनतळाअभावी अडचण होत आहे. काही ठिकाणी पोलीस ठाण्याच्या जवळपासच्या मोकळ्या जागा पार्किंगसाठी तात्पुरत्या वापरल्या जात आहेत. परंतु सरसकट मोकळे भूखंड विकासकांच्या घश्यात घातले जात असल्याने पोलीस ठाण्यांसाठी हक्काची जागा मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्तालयाबाहेरही रस्त्यावर पार्किंग-सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयात अधिकारी वगळता इतरांना आतमध्ये वाहने घेऊन जाण्यास बंदी आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रस्त्यावरच आपली वाहने उभी करावी लागतात. काही वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी आयुक्तालयाबाहेरील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाईच्या सूचना वाहतूक शाखेला दिल्या होत्या. पोलीस ठाण्याला जागाच नाही- पोलिसांकडून मागणी करूनदेखील अनेक पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. तर काही ठिकाणी जागा मिळूनदेखील अद्याप नवे पोलीस ठाणे उभारलेले नाही. वाहतूक शाखा पूर्णपणे दुर्लक्षित असल्याने पुलाखाली अथवा पदपथांवर बांधकाम करून कामकाज हाताळावे लागत आहे. यामुळे त्या ठिकाणीदेखील रस्त्यांवर वाहने उभी करावी लागत आहेत.
वाहनतळाची सोय नाही
नवी मुंबईत १० पोलीस ठाणे व ८ वाहतूक शाखा आहेत. त्यापैकी काही पोलीस ठाणे वगळता इतर कुठेही वाहनतळाची स्वतंत्र सोय नाही. यामुळे तिथे कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर अथवा पोलीस ठाण्याच्या आवारातच वाहने उभी करावी लागत आहेत.