IPL सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा; बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:38 AM2022-04-13T08:38:53+5:302022-04-13T08:39:07+5:30
आयपीएलच्या सामना सुरू असताना बंदोबस्त सोडून बायोबबल क्षेत्रात घुसून धिंगाणा घालणाऱ्या दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई :
आयपीएलच्या सामना सुरू असताना बंदोबस्त सोडून बायोबबल क्षेत्रात घुसून धिंगाणा घालणाऱ्या दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही पोलीस शिपाई असून, एक नवी मुंबई आयुक्तालयातील, तर दुसरा ठाणे आयुक्तालयातील कर्मचारी आहे. रविवारी रात्री त्यांनी केलेला हा धिंगाणा कॅमेराच्या माध्यमातून बीसीसीआयच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
रविवारी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएलचे गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळला जात होता. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावेळी स्टेडियममध्ये बायोबबल क्षेत्र तयार केले जात असून, त्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. यानंतरदेखील रविवारी रात्री दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणच्या बंदोबस्तावरील महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालून बायोबबल क्षेत्रात घुसले.
घटनेवेळी दोन्ही पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना पकडून आवरते घेण्यासाठी इतर पोलीस त्यांच्या मागे धावत होते. ही घटना कॅमेराद्वारे बीसीसीआयच्या निदर्शनास आली. त्यामुळे घडलेल्या कृत्याबद्दल त्यांनी गांभीर्य व्यक्त करताच दोघा पोलिसांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र माटे (३३) व नरेंद्र नागपुरे (३६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी माटे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी असून, नागपुरे हे ठाणे पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत.
शिस्तभंगाची कारवाई
दोघा पाेलीस कर्मचाऱ्यांना स्टेडियमच्या बाहेर बंदोबस्तावर नेमले असताना त्या ठिकाणी त्यांनी ऑनड्युटी मद्यपान केले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करून बायोबबल क्षेत्रात शिरकाव केला. याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.