पनवेल : पनवेल शहरात घरफोड्या तसेच चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलिसांनी आॅलआऊट आॅपरेशन हाती घेतले आहे. यासाठी पोलीस मित्रांबरोबर सगळे पोलीस शनिवारी रात्री रस्त्यावर उतरले होते. परिमंडळ-२मध्ये हे अभियान पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासी अधिक सुरक्षितता अनुभवतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.पनवेल पोलीस ठाण्यांतर्गत पनवेल शहर त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांचा समावेश आहे. यंदा गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण सुध्दा वाढविण्यात पोलिसांना यश आले आहे. असे असले तरी घरफोडीच्या घटना मात्र प्रतिदिन वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी शनिवारी आॅल आऊट आॅपरेशन हाती घेतले. याकरिता पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलेले पोलीस मित्रांनासुध्दा मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले होते. प्रत्येक बीटमध्ये दोन कर्मचारी आणि तीन पोलीस मित्रांनी रविवारी पहाटेपर्यंत गस्त घातली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या पथकाने रात्रभर हद्दीतील सर्व सोसायट्यांना भेट दिली. त्याचबरोबर सुरक्षारक्षक अलर्ट आहेत की नाही याची तपासणीही करण्यात आली. या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी म्हणजे बसस्थानक, उड्डाणपुलाच्या खालचा भाग रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले. (वार्ताहर)
पनवेलमध्ये पोलिसांचे आॅलआऊट आॅपरेशन
By admin | Published: January 26, 2016 2:09 AM