पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2025 12:23 IST2025-03-20T12:23:05+5:302025-03-20T12:23:27+5:30
मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत.

पोलिसांची ‘शक्ती’ उतरणार समुद्रात; दुरुस्तीनंतर आजपासून वापराला सुरुवात
सूर्यकांत वाघमारे -
नवी मुंबई : नवी मुंबईपोलिस दलातील शक्ती बोट आज, गुरुवारपासून सागरी गस्तीला वापरली जाणार आहे. गतमहिन्यात ‘लोकमत’ने पोलिसांच्या सातही बोटी नादुरुस्त अवस्थेत असल्याने सागरी सुरक्षा उघड्यावर पडल्याचे समोर आणले होते. यानंतर पोलिस आयुक्तालय स्तरावर शक्ती या बोटीची दुरुस्ती करण्यात आली असून, बुधवारी तिची चाचणी घेण्यात आली.
मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व दिले जात आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस दलामध्ये ७ गस्ती बोटी पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीचा करार संपल्याने या बोटींची दुरुस्ती होऊ शकली नाही. तर नवी मुंबई पोलिसांनी कळवूनही शासन स्तरावर निर्णय न होऊ शकल्याने या बोटी धूळ खात पडून होत्या. परिणामी, उघड्यावर पडलेली सागरी सुरक्षा भाड्याच्या साध्या बोटींमधून करण्याची वेळ पोलिसांवर आली होती. यासंबंधीचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त स्तरावर शक्ती या बोटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पंधरा दिवसांत या बोटीमध्ये आवश्यक सर्व कामे करून तिला वापरायोग्य करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी या बोटीची चाचणी घेण्यात आली. यामध्ये ती पुन्हा वापरायोग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारपासून ती प्रत्यक्षात सागरी गस्तीसाठी वापरली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी सांगितले.
बोटींच्या दुरुस्तीचा करार मार्च २०२४ मध्येच संपला
नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या सातही बोटींच्या देखभाल दुरुस्तीचा करार मार्च २०२४ मध्येच संपलेला आहे. यामुळे नादुरुस्त अवस्थेत असलेल्या सागराधीश, तरण, सुरक्षा, कर्नाळा, शक्ती व पाताळगंगा या बोटींना अद्ययावत करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. परंतु, निर्णयाचे घोंगडे अद्याप भिजत पडले असल्याने भाड्याच्या बोटीने गस्त घालावी लागत आहे. त्यामध्ये अनेक अडचणी व गस्ती पोलिसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने अखेर शक्ती बोटीची आवश्यक डागडुजी पोलिस आयुक्तालय स्तरावरच उरकून तिला वापरात आणले जात आहे.