एपीएमसीजवळील बारवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:49 PM2019-11-21T22:49:42+5:302019-11-21T22:49:45+5:30
पाच जणांना अटक; वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे उघड
नवी मुंबई : एपीएमसीजवळील बारवर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. ४० महिला वेटरना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. बारच्या नावाने वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
येथील मॅफ्को मार्केटला लागून ब्ल्यू स्टार बार आहे. लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी मुली उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला होता. ११.३० वाजता एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्याने पसंत केलेल्या मुलीला याच परिसरातील एका लॉजवर घेऊन जाण्याची परवानगी बार व्यवस्थापनाने दिली.
मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी बार व लॉज दोन्ही ठिकाणी छापा टाकला. बारमधून जवळपास ४० मुलींना ताब्यात घेतले. व्यवस्थापकासह एकूण पाच जणांना अटक केली आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी बारमधून ताब्यात घेतलेल्या सर्व महिला वेटरना वैद्यकीय तपासणीसाठी मनपा रुग्णालयात पाठविले. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याचेही निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर महिला वेटरना सोडून देण्यात आले आहे.
एपीएमसी परिसरामधील या बारमध्ये अनेक दिवसांपासून अशाप्रकारचा व्यवसाय सुरू होता. बारविषयी स्थानिक नागरिकांनीही या पूर्वी अनेक वेळा तक्रारी दिल्या होत्या. रहिवासी क्षेत्र असल्यामुळे येथे लेडीज सर्व्हिस बारला परवानगी दिली जाऊ नये, यासाठीही पत्रव्यवहार केले होते. या परिसरामधील लॉजमध्येही अनैतिक व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या; परंतु याविषयी ठोस पुरावे नसल्याने कारवाई होत नव्हती. गुन्हे शाखेच्या पथकाकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे उपआयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याविषयी पिटा कायद्यांतर्गत एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.