नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर कारवाईची मोहीम गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून राबवली जात आहे. त्यानुसार चालू वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ३५ महिलांवर कारवाई केली आहे. पोलिसांकडून सातत्याने सुरू असलेल्या या कारवायांमुळे एपीएमसी, सानपाडा व इतर ठिकाणचे अनेक अड्डे कायमस्वरूपी बंद झाले आहेत.
शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यालगत अथवा आडोशाच्या ठिकाणी वेश्याव्यवसायाचे अड्डे चालत होते; परंतु स्थानिक पोलिसांकडून त्यावर कारवाई करण्यासाठी कानाडोळा होत असे. या संदर्भात प्राप्त होणाºया तक्रारींच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अशा अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. शुक्रवारी रात्रीही पनवेल येथील शिवाजी चौक परिसरात अशीच कारवाई करण्यात आली. अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी रहदारीच्या मार्गालगत वेश्याव्यवसाय चालायचा. मात्र, कारवाई करूनही तो बंद झालेला नव्हता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा तेथे कारवाई करून दहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. एएचटीयू पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनिता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, उपनिरीक्षक ज्योती सूर्यवंशी, हवालदार जगदीश पाटील, पोलीस नाईक विकास जाधव, वैशाली धनगर आदीच्या पथकाने या कारवाया केल्या. जुईनगर स्थानकाबाहेर तीन, सानपाडा स्थानकाबाहेर पाच, तर तुर्भे जनता मार्केटलगतच्या पुलाखाली १७ महिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे.