नवी मुंबई : पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी छापे टाकून अवैध धंदेचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून सिगारेट, गांजासह देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईची ठोस मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नेरुळ, वहाळगाव तसेच सीबीडी परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांनी या कारवाया केल्या आहेत, त्यानुसार मागील दोन दिवसांत तीन ठिकाणी छापे टाकून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वहाळगाव येथील शाळेलगतच्या परिसरात देशी दारू विकली जायची. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून अमर महादेव पाटील याला अटक केली. तो वहाळगावचा राहणारा असून, अनेक दिवसांपासून देशी दारूची विक्री करायचा. त्याच्याविरोधात एनआरआय पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नेरुळ सेक्टर २८ येथील बालाजी मंदिरालगतच्या झोपडपट्टीत गांजा विकला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी दोन महिलांकडे मोठ्या प्रमाणात गांजाच्या पुड्या आढळून आल्या.
दरम्यान, सीबीडी येथील न्यू दिल्ली दरबार नावाच्या पानाच्या टपरीवर वैज्ञानिक इशारा नसलेली सिगारेट व तंबाखू विकला जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती, यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने त्या ठिकाणी विकल्या जाणाऱ्या साहित्यांची पाहणी केली. या वेळी वैज्ञानिक इशारा छापील नसलेले विविध प्रकारच्या सिगारेट व तंबाखू आढळून आला. यानुसार टपरीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले आहे.