पोलिसांकडून चार कोटींचा मुद्देमाल परत, १९१ गुन्ह्यांमधील ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:13 AM2019-02-06T04:13:17+5:302019-02-06T04:13:31+5:30
शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.
नवी मुंबई - शहरातील विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी त्यांनी रेहान कुरेशीच्या प्रकरणात केलेल्या तपासाबाबत नवी मुंबईपोलिसांचीही पाठ थोपटली.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या विविध गुन्ह्यांची गत कालावधीत उकल झालेली आहे. त्यानुसार १९१ गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ४ कोटी ३ लाख १९१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केला
आहे.
पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत केला. त्यामध्ये ८९ वाहने व ६३ सोन्याच्या दागिन्यांचा तसेच मोबाइल व रोख रकमेचा समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गुन्ह्यांची उकल करून त्यामध्ये जप्त केलेला ऐवज तक्रारदारांना परत करणे हा पोलिसांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासाठी न्यायालयाची अत्यंत कठीण प्रक्रिया असून नवी मुंबई पोलिसांनी ती
वेळेत पूर्ण केल्याचेही समाधान व्यक्त केले.
नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून आठ वर्षांपासून सीआयडी तसेच पोलिसांना चकमा देणाऱ्या रेहान कुरेशीला अटक केल्याबद्दल देखील नवी मुंबई पोलिसांची कौतुकाने पाठ थोपटली. पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्राची मर्यादा असते, तर गुन्हेगारांना कसलीही मर्यादा नसते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी अत्यंत शिताफीने आपल्या हद्दीसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमास पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त पंकज डहाणे, सुधाकर पठारे, अशोक दुधे, राजेश बनसोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी पोलिसांसाठी उभारण्यात आलेली व्यायामशाळा, महिला सहाय्यता कक्ष तसेच पोलीस व त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी फिरते रुग्णालय यांचा शुभारंभ महासंचालकांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलिसांसाठी २५० हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील वाहतूककोंडी व जप्तीची वाहने यांची मोठी समस्या ठरत असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.
गुन्ह्यामध्ये अथवा अपघातात जप्त केलेले वाहन विम्याचा कालावधी संपल्यानंतर संबंधितांकडून घेण्यास टाळाटाळ केली जाते. अशी २४४ असून त्यापैकी १०६ वाहनांची विल्हेवाट आजवर लावली असून १०८ वाहनांची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एखाद्या गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची अपेक्षा राहत नाही. मात्र पोलिसांकडून कौशल्यपूर्ण तपासाअंती चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याची भावना तक्रारदार निवृत्त पोलीस निरीक्षक
अरविंद जयकर यांनी व्यक्त केली.