पनवेल: मैदानावर पावसाच्या सरी कोसळल्याने पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मैदान सुस्थितीत नसल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस भरती प्रक्रीया दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे बुधवारी सकाळी जाहीर केले. 185 पोलीस कर्मचारी या पदांसाठी तब्बल 7 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 19 ते 26 जूनपर्यंत ही भरती प्रक्रीया होणार असून बुधवार दि.19 रोजी पहिल्याच दिवशी पावसामुळे मैदान सुस्थितीत नसल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर पुढील दोन दिवस भरती प्रक्रिया पुढे ढकल्याचे जाहीर केले.नवी मुंबईची पोलीस भरती प्रक्रियेतील 19 व 20 जूनरोजी होणार्या उमेदवारांची मैदानी चाचणी 23 जूनला सूरु होईल. 21 व 22 जूनच्या उमेदवारांची मैदानी चाचणी 27 जूनला करण्याचे नियोजन नवी मुंबई पोलीस दलाने आखले आहे. याबाबतची माहिती पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना संकेतस्थळावरुन तसेच उमेदवारांच्या मोबाईल फोनवर पोलीस विभागाकडून कळविण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील पोलीस भरती प्रक्रियेसाठी कळंबोली येथील रोडपाली जवळील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून कडेकोट पोलीस बंदोबस्त पोलीस आयुक्तांनी लावला होता.