नवी मुंबई : शहराला नशामुक्त करण्याच्या अनुशंघाने नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कारवाईच्या विशेष मोहीम राबवून अमली पदार्थांची नशा करणारे, गुटखा विक्रेते यांच्यासह इतर अवैध धंदेचालकांवर कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार २४ व २५ मे या दोन दिवसात १०८ हुन अधिक कारवाया केल्या असून त्यामद्ये कोटपा कायद्यांतर्गत ७६ कारवायांमधून ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात उघड्यावर गुटखा विक्रीसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शहराला नशामुक्त करण्यासाठी पाऊल उचलण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त विवेक पानसरे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ एक मध्ये दोन दिवस कारवाईची मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये एनडीपीएस, दारू विक्री, गुटखा विक्री यासह कोटपा कायद्यांतर्गत एकूण १०८ कारवाया करण्यात आल्या आहेत.
उपायुक्तांच्या निर्देशानुसार सर्वच पोलिसठाण्यांतर्गत आडोशाच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली जात आहे. त्यात शाळा, महाविद्यालयांभवतीचा परिसर, मोकळी मैदाने, उद्याने यासह गर्दुल्यांच्या बसण्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी नशा करताना किंवा धूम्रपान करताना आढळणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहेत. त्याशिवाय गुटखा विक्री करणाऱ्या टपरीचालकांचा देखील शोध घेऊन कारवाया केल्या जात आहेत. त्याद्वारे परिमंडळ एक मधील दहा पोलिसठाने अंतर्गत १०८ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात एनडीपीएसच्या १२ कारवाया, अवैध दारू विक्रीच्या ८ कारवाया, गुटखा विक्रीच्या १२ तर कोटपा कायद्यांतर्गत ७६ कारवाया केल्या आहेत. त्यात ४४ हजार रुपये किमतीचा गुटखा विविध टपऱ्यांवरून जप्त करण्यात आला आहे. तर कोटपा कायद्यांतर्गत ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर नेरूळमध्ये ई सिगारेट विक्रेत्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ १ मधील कारवाया
- एनडीपीएस - १२
- दारू विक्री - ०८
- गुटखा विक्री - १२
- कोटपा - ७६