पीडित महिलांना पोलिसांचे पाठबळ

By admin | Published: April 26, 2017 12:13 AM2017-04-26T00:13:00+5:302017-04-26T00:13:00+5:30

विविध प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पोलिसांकडून मनोधैर्य योजना राबवली जात आहे.

Police support the afflicted women | पीडित महिलांना पोलिसांचे पाठबळ

पीडित महिलांना पोलिसांचे पाठबळ

Next

नवी मुंबई : विविध प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पोलिसांकडून मनोधैर्य योजना राबवली जात आहे. त्याकरिता पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत मागील दीड वर्षात १७२ पीडित महिलांना मानसिक आधार देण्यात आलेला आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान पीडित महिलांना मानसिक आधार देण्याचे देखील कार्य पोलिसांकडून केले जात आहे. त्याकरिता गुन्हे शाखेअंतर्गत विशेष शाखा तयार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे- अल्फांसो यांच्यावर या पथकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पथकाने मागील दीड वर्षात १७२ पीडित महिलांची भेट घेवून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम केले.
कौटुंबिक वाद, लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणांमध्ये पीडित असलेल्या महिलांकरिता ही शाखा कार्यरत आहे. नवी मुंबई आयुक्तालयात मागील अडीच वर्षात ४०० महिला विविध प्रकरणांमध्ये पीडित झाल्या आहेत. अनेकदा घडलेल्या प्रसंगानंतर त्यातून सावरण्यासाठी पीडित महिलेला आधाराची गरज असते. मात्र कुटुंबाकडून हा अपेक्षित आधार न मिळाल्यास त्या महिलेच्या भावी आयुष्यावर परिणाम उमटू शकतात. हे टाळण्यासाठी पोलिसांनी मनोधैर्य संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यानुसार अल्फान्सो यांच्या पथकाने २०१६ मध्ये १३८ तर चालू वर्षात ३४ पीडित महिलांची भेट घेवून त्यांना धीर दिला. शिवाय त्यांना अद्यापही संबंधितांकडून त्रास होत आहे का याची चौकशी केली. त्यापैकी ६३ पीडित महिलांची माहिती महिला व बालविकास कार्यालयाला कळवली आहे. दरम्यान, ६ पीडित महिलांना संबंधितांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे समोर आले. याची दखल घेत त्रास देणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये देखील महिला अत्याचाराच्या बळी पडू नयेत, याकरिता कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले जात आहे, तर अद्यापपर्यंत विविध कार्यालये व कार्यक्रमांच्या माध्यमातून मार्गदर्शिका वाटून महिलांमध्ये जागृती करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police support the afflicted women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.