वाहतूक नियमन करताना पोलिसांची दमछाक
By admin | Published: May 17, 2015 11:19 PM2015-05-17T23:19:10+5:302015-05-17T23:19:10+5:30
सायबर सिटीची पहिली वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यंत्रणेवर
नवी मुंबई : सायबर सिटीची पहिली वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यंत्रणेवर पडत आहे. अरुंद रस्ते, रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या झेब्रा क्रॉसिंगचा अभाव, त्यातच फेरीवाल्यांचे दुतर्फा अतिक्रमण यामुळे वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाशीत वाहनांची मोठी वर्दळ असते. विविध कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स, मोठमोठे शोरूम्स, बांधकाम विकासकांची कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, शाळा व महाविद्यालये आदींमुळे वाशीचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. विविध कामांनिमित्त शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांचीही येथे वर्दळ असते. याचा परिणाम म्हणून या परिसरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांनाही अनेकदा वाहन कोंडीचा फटका बसतो.अपुरे मनुष्यबळ आणि अत्यावश्यक सुविधांअभावी वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे दैनंदिन नियमन करताना कसरत करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही दळणवळण सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी थेट महापालिकेला साकडे घातले आहे.
वाशी-कोपरखैरणे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्याला आळा घालण्यासाठी या मार्गावरील शिवाजी चौक, फायर ब्रिगेड चौक, ब्लू डायमंड चौक तसेच सेक्टर-१७ येथील वाशी प्लाझा, महात्मा फुले चौक रेल्वे स्थानकाजवळील सेंटर वन चौक व संभाजी चौक या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत आहेत. पण अनेक वाहनचालक सिग्नलला जुमानत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी तसेच वाहनांची समान गती राखण्यासाठी सिंक्रोनायझेशन सिग्नल यंत्रणेचा अवलंब करावा, अशी विनंती पवार यांनी महापालिकेकडे केली आहे.
वाशी वाहतूक शाखेंतर्गत खाडीपूल ते जुई पूल हा महामार्गाचा भाग येतो. वाशी गाव, स्टेशनपासून कोपरखैरणेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू डायमंड चौकापर्यंतच्या भागाचा यात समावेश आहे. संपूर्ण परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरील वाशी उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी आहे. वाहतुकीसंदर्भातील कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांना या चौकीत यावे लागते. (प्रतिनिधी)