नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज; चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:20 AM2019-12-30T01:20:03+5:302019-12-30T01:20:06+5:30
ऑर्केस्ट्रा, हॉटेलव्यावसायिकांना पहाटेपर्यंत परवानगी
नवी मुंबई : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारपासूनच शहरात महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात येणार असून, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवरही अधिक भर दिला जाणार आहे. तर शासन निर्णयानुसार नववर्षाच्या पहाटेपर्यंत आॅकेस्ट्रा, हॉटेल व बार खुले ठेवण्यास अनुमती असून, त्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. अनेक जण मित्रांसोबत अथवा सहकुटुंब पार्टी करून नववर्षाचे स्वागत करतात. त्यानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, बार व्यावसायिकांकडून खास सवलती देण्यात आल्या असून, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यानुसार पहाटेपर्यंत शहरात जल्लोष चालणार असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. आॅकेस्ट्रा, बार व हॉटेल व्यावसायिकांना पहाटे ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र त्याकरिता पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. या दरम्यान आस्थापनेकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
नववर्षाच्या आनंदोत्सवात अनेक जण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात. त्यांच्यामुळे अपघाताची शक्यता असून, इतर व्यक्तींच्याही जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अशा घटनांना आळा घालण्यासाठी थर्टीफस्टच्या रात्रीपासून ते नववर्षाच्या सकाळपर्यंत पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची झडाझडती घेऊन ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवायांवर भर दिला जाणार आहे. त्याशिवाय शहरातील महत्त्वाचे चौक, रहदारीचे मार्ग यावरदेखील पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस, वाहतूक पोलीस, तसेच विशेष शाखेच्या पोलिसांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय आयुक्तालय कार्यक्षेत्रातील दोन्ही परिमंडळांमध्ये गस्ती पथके तयार केली आहेत.
विनापरवाना पार्ट्यांचे आयोजन करण्यावर बंदी असून, फार्महाऊस अथवा रेसॉर्टच्या ठिकाणी पार्ट्या होत असल्यास पोलिसांची नजर राहणार आहे. या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा, तसेच अवैध दारूसाठ्याचाही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा संशयित ठिकाणांवर पोलिसांची नजर असणार आहे.
थर्टीफस्टच्या अनुषंंघाने अनेकांनी रविवारपासूनच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पोलिसांनीदेखील रविवारी रात्रीपासूनच नाकाबंदी करून ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कारवायांना सुरुवात केली आहे. त्याकरिता बारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.