नवी मुंबई : कंटेन्मेंट झोन परिसरांवर पोलिसांचा वॉच ठेवण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांच्या नाहक वर्दळीला चाप बसणार असून, नियमांचेही पालन होणार आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असलेल्या ३० ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु या भागात राहणाऱ्या नागरिकांकडून नियमावलीचे पालन केले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई पोलीस यांनी घेतली असून, आता याभागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, बुधवारी, ९ सप्टेंबरपासून पोलिसांच्या मदतीने कंटेन्मेंट झोन परिसरांवर वॉच ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील अनेक कंटेन्मेंट झोनमध्ये पोलीस आणि होमगार्ड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई शहरात २८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरात जास्त प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या सुमारे ३३ ठिकाणांना पालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर केले असून, अत्यावश्यक सेवा वगळता ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाºया नागरिकांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे, याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत सोसायटीला पत्राद्वारे कळविण्यात आले असून, तसे बॅनर बसविण्यात आले आहेत. या परिसरातील १०० मीटर अंतरामधील सर्वांसाठी नियमावली बंधनकारक आहे.
परंतु तेथे सूचनांचे पालन केले जात नसून नागरिकांची सर्रास वर्दळ सुरूच आहे, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानेही सुरूच आहेत. इतर ठिकाणचे नागरिकही खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता महानगरपालिका आणि पोलिसांच्या मदतीने वर्दळीला चाप बसणार असून, नियमांचे पालन होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये कंट्रोल मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या भागात ये-जा करण्याचे मार्ग बंद करण्यात आल्याने संबंधित भागात राहणाºया नागरिकांना थोडा त्रास होईल, पण या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन सुरूच आहे. या भागातील दुकाने बंद राहणार आहेत.- अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका