नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ मधील २ कोटी ९ लाख रूपयांच्या दरोड्यामधील आरोपी महिला पोलीस पत्नी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही त्या महिलेवर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे बोलले जात आहे. याविषयी पोलिसांनी अधिकृतपणे काहीही भाष्य केलेले नसून लवकरच दरोड्यातील सर्व आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.येथील कुसुम गृहनिर्माण सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर २७ आॅक्टोबरला सशस्त्र दरोडा पडला. महिलेसह सहा दरोडेखोरांनी पिस्तूल व इतर शस्त्रांचा धाक दाखवून तब्बल २ कोटी ९ लाख रूपयांचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली. या घटनेमुळे शहरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये स्पष्ट दिसत असून त्या आधारे तपास सुरू केला आहे. दरोड्यामधील महिलेची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही महिला पोलीस कर्मचाºयाची पत्नी असून तिच्यावर यापूर्वीही एक गुन्हा दाखल झाला असल्याचे बोलले जात आहे. पोलीस पत्नीच्या सहभागाच्या चर्चेने या गुन्ह्याविषयी उत्सुकता वाढली आहे. आरोपी महिला खरोखर पोलीस पत्नी आहे का, तिने दरोडेखोरांच्या टोळीत का सहभाग घेतला याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत. परंतु पोलिसांनी अद्याप याविषयी काहीही माहिती दिलेली नाही. दरोड्याचा तपास वेगाने सुरू आहे. जवळपास आरोपींची नावे व इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचेही बोलले जात आहे. सर्व आरोपींना अटक करून मुद्देमाल संकलित करण्यावर लक्ष केंद्रित केले असून लवकरच या गुन्ह्याची पूर्णपणे उकल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींच्या अटकेनंतर महिलेची वस्तुस्थिती समोर येणार आहे.
वाशीतील दरोड्यामध्ये पोलीस पत्नीचा सहभाग? दरोड्याचे गूढ उकलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:44 AM