नामदेव मोरे, नवी मुंबई२०१५ हे वर्ष नवी मुंबई पोलिसांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का लावल्यामुळे पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आहे. दहा वर्षांमध्ये प्रथमच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयामध्ये गुन्हे सिद्ध करण्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे प्रमाण राज्यात सर्वात जास्त आहे. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु गुन्हे प्रकटीकरणामध्ये अपेक्षित वाढ होत नव्हती. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता. रात्री घराबाहेर उभे केलेले वाहन सकाळी तेथे दिसेलच याची खात्री राहिली नव्हती. के. एल. प्रसाद यांनी आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनस्तरावर गुन्ह्यांचे प्रकटीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले. परिमंडळ एक, परिमंडळ दोन व गुन्हे शाखेमध्ये चांगला संवाद सुरू केला. पोलीस व नागरिकांमधील सुसंवाद वाढविण्यावरही प्रभात रंजन यांनी भर दिला आहे. शहरातील पोलीस मित्रांची संख्या वाढविली. परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी शहरातील जुगार अड्डे बंद केले आहेत. परिमंडळ दोनचे विश्वास पांढरे यांनी आदिवासींसाठी तीन ट्रक साहित्य शहरवासीयांकडून संकलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरेश मेंगडे गुन्हे शाखेचे उपआयुक्त असताना संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यमान उपआयुक्त दिलीप सावंत यांनीही त्यांच्या कामाचा प्रभाव दाखविण्यास सुरवात केली असून वाहनचोरीची टोळी पकडून त्यांच्याकडून एकाचवेळी २१ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी २०१५ मधील ६७ टक्के गुन्ह्यांचा तपास लावला आहे. दहा वर्षातील ही विक्रमी कामगिरी आहे. शिवाय २०१४ मधील तब्बल १४२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. गतवर्षी ५२८८ गुन्हे घडले होते. यामधील ३६२० गुन्ह्यांचा वर्षभरात उलगडा झाला होता. यावर्षी १४२ गुन्ह्यांचा उलगडा केल्यामुळे ही संख्या ३५६१ झाली आहे. गतवर्षीच्या गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६५ टक्के होते ते आता ६७ टक्के झाले आहे.
पोलिसांची दहा वर्षांतील विक्रमी कामगिरी
By admin | Published: January 08, 2016 2:15 AM