नवी मुंबई - पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. रविवारी शहरातील तब्बल ८६ हजार ८५५ मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ७३८ बुथवर व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी २ हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महानगरपालिकेकडे १ लाख २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत.‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ या घोषवाक्यासह महानगरपालिकेने शहरभर लसीकरणासाठी जनजागृती केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात ५ लाख ५३ हजार ४९८ घरांची नोंद आहे. शहरातील प्रत्येक मुलाला लस उपलब्ध व्हावी यासाठी मनपाचा प्रयत्न आहे. प्रत्येक घरापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी ७६० पथके तयार केली होती. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी १६० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये ८०० बॅनर, ३ हजार पोस्टर्सच्या माध्यमातून शहरभर जागृती करण्यात आली आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातूनही लसीकरणाची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील ८६,८५५ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यायची याविषयी सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने पोलिओ लसीकरण अभियान प्रत्येक वेळी प्रभावीपणे राबविले आहे. या वेळीही ते यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे. कोविड काळात पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. याकरिता घरोघरी, एसटी स्टॅण्ड, मुख्य चौक आदी ठिकाणी मोबाइल पथक हे डोस देणार आहेत.पोलिओ लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारीही घेतली असून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. प्रत्येक मुलाला लस मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.- डॉ. रत्नप्रभा चव्हाण, नोडल अधिकारी महानगरपालिका
82 हजार बालकांना आज पोलिओ डोस, नवी मुंबईत ७३८ बुथवर व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 2:11 AM