निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ‘खानावळी’चा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:00 AM2019-03-29T00:00:18+5:302019-03-29T00:01:34+5:30
ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. काठावर असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. त्यासाठी रात्रीच्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत.
काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या महिनाभर चालणाऱ्या या खानावळीसाठी शहरातील हॉटेल्सच बुक करून ठेवल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे शहराबाहेरील फार्महाउसवरही कार्यकर्त्यांसाठी गटागटाने दारू आणि मटणांच्या पार्ट्या झडत आहेत.
ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे अनंद परांजपे यांच्यातच खरी चुरस असणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने शिवसेना-भाजपा युतीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विजयाच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम वॉर्ड पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात शिवसेनेने पदाधिकाºयांची बैठक घेतली. ठाणे लोकसभा मतदार संघातून ९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने प्रचाराचा धडका सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वी नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक नाराज कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी रात्रीच्या मेजवानीचे नियोजन केले जात आहे. या जेवणावळीची जबाबदारी त्या त्या विभागातील प्रमुख पदाधिकाºयांवर देण्यात आली आहे. त्यानुसार ठरावीक हॉटेल्स महिनाभरासाठी बुक करण्यात आली आहेत.
सध्या या हॉटेल्समधून दिवसभरात ४० ते ५० कार्यकर्त्यांच्या पार्ट्या झडत आहेत. महत्त्वाचे कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदीची शनिवार आणि रविवारी लोणावळा, कर्जत, खालापूर, अलिबाग तसेच मुरबाड येथील फार्महाउसवर आवभगत केली जात आहे. याचा परिणाम म्हणून या विभागात वाहनांची रेलचेल वाढल्याचे दिसून येते.
निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली नसल्याने सध्या खानावळीचे स्वरूप मर्यादित आहे; परंतु १० एप्रिलपासून या पार्ट्यांचा खºया अर्थाने धडाका सुरू होणार आहे. त्या दृष्टीने प्रमुख पक्षांच्या उमेदवारींनी आतापासून नियोजन सुरू केले आहे, त्यामुळे पुढील महिनाभर तरी कार्यकर्त्यांसह त्या त्या विभागातील मतदारांवर प्रभाव टाकणाºया विविध क्षेत्रातील धुरिणांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व वाढले
प्रचारात घोषणाबाजी आणि आंदोलनापुरते अस्तित्व मर्यादित असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढू लागले आहे. पाच वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या कार्यकर्त्यांची आता आस्थेने विचारपूस केली जात आहे. त्यांना मानाची वागणूक दिली जात आहे. उमेदवारांकडून त्यांची आस्थेने विचारपूस केली जात आहे. विशेषत: विविध कारणांमुळे नाराज असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे काम सध्या प्रभावीपणे सुरू आहे.