अलिबागमध्ये राजकीय घडामोडींना वेग
By admin | Published: September 23, 2016 03:25 AM2016-09-23T03:25:40+5:302016-09-23T03:25:40+5:30
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल आणि त्यांची सून चित्रलेखा या दोघांची नावे अलिबाग नगर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत.
आविष्कार देसाई , अलिबाग
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल आणि त्यांची सून चित्रलेखा या दोघांची नावे अलिबाग नगर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे आमदार पाटील यांनी दोघांनाही शहरातील राजकारणात सक्रिय केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी दोघांनाही प्रशांत नाईक यांच्या पॉलिटिकल मायलेजवर स्वार होऊन राजकीय उंची गाठावी लागणार ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शेकापच्या या निर्णयाने राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे.
अलिबाग नगर पालिकेवर शेकापची एक हाती सत्ता आहे. १७ पैकी १६ नगरसेवक हे शेकापचे आहेत, तर एक नगरसवेक हा काँग्रेसचा आहे. नगराध्यक्षपदाची धुरा प्रशांत नाईक यांच्याकडे आहे. प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या त्यात्या वेळी नाईक यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविला आहे. अलिबाग नगर पालिका आणि प्रशांत नाईक हे समीकरण कायम आहे. नाईक यांच्या पत्नी नमिता नाईक यांचीही नगराध्यक्षपदाची कारकीर्द उल्लेखनीय राहिली होती. दूरदृष्टीचे बरचसे निर्णय हे त्यांच्याच कार्यकाळात घेतले गेले होते.
नाईक हे अलिबागचा कारभार सांभाळत असताना त्यांच्या सोबतीला आता नगर पालिका हद्दीत नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांना उतरविण्यात आले आहे. काहीच दिवसांपूर्वी नृपाल आणि चित्रलेखा पाटील यांची नावे पेझारी मतदार यादीतून कमी करुन आता अलिबाग शहरात नोंदविण्यात आली आहेत. नृपाल पाटील यांनी या आधी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांचा राष्ट्रवादीच्या महेंद्र दळवी यांनी पराभव केला होता. त्यानंतर नृपाल यांनी राजकारणापासून अलिप्त राहून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांना राजकारणात पुन्हा सक्षमपणे सक्रिय करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी अलिबाग शहराची निवड केली आहे. त्याचप्रमाणे नृपाल यांच्या पत्नी चित्रलेखा या शेकापच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला अलिबागमधूनच चांगला आकार मिळणार होता. कारण अलिबाग शहरातील राजकारणावर प्रशांत नाईक यांची चांगलीच पकड आहे. त्यांनी तेथे चांगले ग्राऊंड तयार केले आहे. त्यामुळे नृपाल आणि चित्रलेखा यांच्यासाठी ते लाभदायक ठरणारे आहे.
नाईक हे नृपाल यांचे नात्याने मामा लागतात. मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक इमारतीच्या उद््घाटन प्रसंगी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नृपाल, चित्रलेखा यांना नाईक यांच्या पॉलिटिकल मायलेजवर स्वार होऊनच राजकीय उंची गाठावी लागणार असल्याचे बोलले जाते.
सर्वांचेच लक्ष वेधले
निवडणुकीच्या तोंडावर मतदार ग्रामीण भागातून शहरी भागात, तर शहरी भागातून ग्रामीण भागात आपली नावे नोंदविण्याची प्रक्रिया करीत असतात. परंतु एखादा मतदार हा एखाद्या बलाढ्य नेत्याचा नातेवाईक असतो तेव्हा त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते आणि त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. तसेच नृपाल आणि चित्रलेखा यांच्या बाबतीत झाले आहे.