नामदेव मोरे
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाल्याने नवी मुंबईत राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील राष्ट्रवादीचे अस्तित्व धुसर होणार आहे. शिवसेनेसह सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे बदलणार असून महापालिकेमध्येही सत्तांतर अटळ समजले जात आहे.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक भारतीय जनता पक्षामध्ये जाणार अशी चर्चा पाच वर्षांपासून सुरू होती. पक्षातीलनगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर नाईकांनीही पक्षांतर करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.महापौर बंगल्यावर झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीला जवळपास ५० जणांनी हजेरी लावली होती. सर्वांनीच पक्षांतराचा आग्रह धरला आहे. नाईकांनी पक्षांतर केले तर महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीची सत्ताही संपुष्टात येणार आहे.आतापर्यंत महापालिकेमध्ये अस्तित्वासाठी झगडणाºया भाजपच्या ताब्यात ही महानगरपालिका येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्यामुळे काँगे्रस, राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेनेमध्ये जाण्यासाठी इच्छूक होते. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्नही सुरू केले होते; परंतु नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास शिवसेनेची ही स्वप्नेही धुळीस मिळणार आहेत.महापालिकेमध्ये दहा नगरसेवक असूनही काँगे्रसला उपमहापौरपद मिळाले असून सत्ता गेल्यामुळे त्यांचे पदही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी नवी मुंबई राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला होता; परंतु २०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्याकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यामुळे पक्ष सोडला. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथम भाजप व नंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाईकांनी पक्ष सोडल्यास राष्ट्रवादीचे अस्तित्व धुसर होणार आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षातील अनेकांनी ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती.संघटनात्मक बांधणीही सुरू केली होती; पण नाईक भाजपमध्ये गेल्यास सर्वांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे.महानगरपालिकेमध्येही परिवर्तननवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला प्रभाव पाडता आला नाही. २००५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचा एकच नगरसेवक निवडून आला होता. यानंतर २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीमध्येही पक्षाचा एकच नगरसेवक निवडून आला. २०१५ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. गणेश नाईक यांनी पक्षांतर केल्यास प्रथमच पालिकेवर भाजपची सत्ता येईल. सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक आहेत. पाच अपक्ष नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा असून भाजपचे सहा नगरसेवक असल्याने त्यांचे संख्याबळ ६३ होणार असून या बळावर पालिकेमधील सत्ता टिकविणे शक्य होणार आहे.संपूर्ण परिवाराचे पुनर्वसन कसे होणारनाईक परिवार भाजपमध्ये गेल्यामुळे ऐरोली मतदारसंघात संदीप नाईक यांना त्याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. संदीप नाईक यांचे पुनर्वसन होणार असले तरी माजी खासदार संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईक यांचे पुनर्वसन कसे होणार हा प्रश्न कायम आहे. भाजप एकाच परिवारातील किती जणांना पदाचा लाभ देणार याकडे लक्ष लागले आहे.विधानसभेचा पेच कायमनाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातील पेच कायम राहणार आहे. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार असून, पाच वर्षांत त्यांनी चांगले काम केले आहे. युती झाल्यास या मतदारसंघावर शिवसेना दावा करणार आहे. पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे या मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमदेवारी मिळणार का? याविषयी साशंकता आहे.राष्ट्रवादीमध्ये कोण थांबणार?राष्ट्रवादी काँगे्रसच्या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. महापौर बंगल्यावर झालेल्या मिटिंगमध्ये सर्वांनी त्या विषयीची भूमिका मांडली असली तरी बेलापूर मतदारसंघातील एक ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये थांबण्याचा आग्रह धरला जात असून त्याविषयी एक मिटिंग सोमवारी कोपरखैरणेमध्ये झाल्याचे वृत्त आहे.जनाधार घसरल्यानेच पक्षांतरमाजी मंत्री गणेश नाईक यांचा जनाधार पाच वर्षांपासून सातत्याने घसरू लागला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे मतदारसंघातून संजीव नाईक यांचा पराभव झाला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांचा पराभव झाला. महानगरपालिका निवडणुकीमध्येही पूर्ण बहुमत मिळविता आले नाही. काँगे्रसबरोबर आघाडी करून सत्ता टिकवावी लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोलीतून शिवसेनेला ४४ हजार मतांची आघाडी मिळाली व बेलापूर मधून ३९ हजार ७२४ मतांची आघाडी मिळाली. हे मताधिक्य कमी करून विजय मिळविणे गणेश नाईक व संदीप नाईक यांच्यासाठी आव्हानात्मक होते. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागामधूनही शिवसेनेला आघाडी मिळाली होती. जनाधार घसरल्यामुळेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाईक कुटुंबीय पक्षांतर करत असल्याची टीका त्यांचे विरोधक करू लागले आहेत.