दिघा गाव स्थानकात राजकीय चढाओढ, काही वेळासाठी झाला तणाव

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 12, 2024 07:34 PM2024-01-12T19:34:00+5:302024-01-12T19:34:58+5:30

भाजप, शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांची गर्दी

Political fight in Digha Gaon station, tension for some time: Crowd of BJP, Shiv Sena, MNS workers | दिघा गाव स्थानकात राजकीय चढाओढ, काही वेळासाठी झाला तणाव

दिघा गाव स्थानकात राजकीय चढाओढ, काही वेळासाठी झाला तणाव

नवी मुंबई : खासदार राजन विचारे यांनी दिघा गाव स्थानकात घुसून स्थानकाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगोदरच स्थानकात असलेले भाजप कार्यकर्ते व विचारे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला असता रेल्वे पोलिसांनी परिस्थिती हाताळली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उलवे येथून दिघा गाव स्थानकाचे उदघाटन करण्यात आले. यामुळे ठाणे वाशी मार्गावरील रेल्वेचा अधिक एक थांबा वाढला आहे. दरम्यान या स्थानकाच्या मंजुरीपासून ते काम पूर्ण होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे स्थानकाच्या उदघाटनावरून देखील त्यांच्याकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. मोदींकडून स्थानकाच्या उदघाटनाच्या घोषणेनंतर दिघा स्थानकात रेल्वे थांबण्यास सुरवात होणार होती.

तत्पूर्वीच दुपारी अडीचच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी स्थानकात जाऊन उदघाटन उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानकात अगोदरच माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. त्यातच मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील स्थानकात प्रवेश केला. यामुळे तीनही पक्षाकडून स्थानकात थांबणाऱ्या पहिल्या लोकलचे स्वागत करण्यासाठी चढाओढ लागली होती.

यादरम्यान जोरजोरात घोषणाबाजी देखील सुरु होती. त्यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थती हाताळली. यावेळी रेल्वे पोलिसचे उपायुक्त मनोज पाटील, सहायक आयुक्त रवींद्र बुधवंत यांच्यासह वाशी व ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. अखेर स्थानकात आलेली लोकल तीनही पक्षातर्फे रेल्वेचे स्वागत करून मोटरमनला पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. 

Web Title: Political fight in Digha Gaon station, tension for some time: Crowd of BJP, Shiv Sena, MNS workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.