अलिबाग : तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात आणि पंचायत समितीचे १४ मतदार संघ आहेत. तालुक्यात एक लाख ८० हजार ३२० मतदारांची संख्या आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिला मतदारांची संख्या येथे पुरुष मतदारांपेक्षा ७९६ने अधिक असल्याने येथील सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य त्यांच्याच हातात राहणार आहे. युती आघाडीचे राजकारण येथे खेळताना उमेदवार उभे करून एकमेकांच्या पायात पाय घातले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अलिबाग तालुक्यामध्ये शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. युतीमधील विशेषत: शेकापला अद्दल घडविण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-भाजपा यांनी आघाडीची मोट बांधली आहे. पनवेल पाठोपाठ अलिबाग तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सात जिल्हा परिषदेचे आणि १४ पंचायत समितीचे सदस्य निवडून जाणार आहेत. त्यामुळे येथील संख्याबळ युती आणि आघाडीला सत्तेसाठी फारच महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे महेंद्र दळवी, काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांची येथील लढाई प्रतिष्ठेची ठरणारी आहे. शिवाय सत्तेला गवसणी घालण्यासाठी पोषक ठरणारी आहे. त्यामुळेच अलिबागवर सर्वच राजकीय नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. अलिबाग तालुक्यात एक लाख ८० हजार ३२० मतदार आहेत. पैकी ८९ हजार ७६२ पुरुष, तर ९० हजार ५५८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे २३ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. थळ मतदार संघातून शिवसेनेच्या मानसी दळवी, शेकापच्या चित्रा पाटील यांच्यामध्येच सरळ लढत होणार आहे. दळवी या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मानसी यांचे पती महेंद्र दळवी त्यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. थळ मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता. महेंद्र दळवी यांनी पक्षाला रामराम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे तेवढ्या ताकतीचा उमेदवार नसल्याने तो शेकापला सोडण्यात आला आहे. शेकापकडे नेतृत्वालाही चित्रा पाटील यांच्या चेहऱ्याशिवाय दुसरा चेहरा मिळाला नाही. चित्रा पाटील यांनी थळ आणि कुडूर्स मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचा एकच उमेदवार दोन मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. कुडूर्समध्ये चित्रा यांच्यासमोर पल्लवी पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले राजा केणी यांनी शिवसेनेते प्रवेश केला. तेथे त्यांच्या पत्नी रसिका केणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.शहापूर मतदार संघामध्ये शेकापचे आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याही शेकापकडून अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वैभव पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील उभ्या आहेत. या दोघांमध्ये सरळ लढत अपेक्षित मानली जाते. मापगावमधून काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजा ठाकूर उभे आहेत. त्यांच्याविरोधात शेकापचे दिलीप भोईर आहेत. या दोघांमध्ये थेट लढत होण्याचे स्पष्ट होते.चेंढरे मतदार संघातून श्रीमंती मगर आणि शेकापच्या प्रियदर्शनी पाटील यांच्यात सरळ लढत असल्याचे दिसून येते. चौलमधून शिवसेनेने सुरेंद्र म्हात्रे यांच्याविरोधात शेकापचे नंदू मयेकर आखाड्यात उतरले आहेत. बेलोशीमध्ये काँग्रेसचे जयवंत लेंडी, शेकापने अनुक्रमे मधु पारधी, धर्मा पिंगळा यांना उमेदवारी दिली आहे. यापैकी एकजण अर्ज मागे घेणार आहे. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी तसेच ताकदवान उमेदवार युती आणि आघाडीतून उभे करण्यात आलेले आहेत.पनवेल तालुक्यात काटे की टक्कर!पनवेल : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४२ नामांकन अर्ज वैध ठरले, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ८० अर्ज वैध ठरले आहेत. पंचायत समितीसाठी वावंजे गणातील एकनाथ देशेकरांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता शेकाप व भाजपा यांच्यात ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता, वर्तवण्यात येत आहे.पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठही जागांवर भाजपा व शेकापने आपले उमेदवार उभे केले आहेत. सेनेला पाली-देवद व पळस्पे येथे उमेदवार उभे करता आलेले नाहीत; पण त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन महासंघाने उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा परिषदेसाठी आघाडीतील राष्ट्रवादीला एकही जागा शेकाप पक्षाने सोडलेली नाही. जिल्हा परिषदेसाठी भाजपा व शेकापमध्ये मुख्य ती लढत होणार हे निश्चित आहे. पंचायत समितीच्या १६ जागांसाठी भाजपाने १६, शेकाप पक्षाने १३, तर सेना १२, राष्ट्रवादी ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. करंजाडी गणात चारी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी सेनेने दोन अर्ज दाखल केले आहेत. वावंजे गणात माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांचा अर्ज मतदार यादीत नाव नसल्याने बाद झाला. या मतदार संघातून शेकाप पक्षाचे काशीनाथ पाटील निवडणूक लढवत आहेत. बहुमत मिळाल्यास शेकाप पक्षाचे काशीनाथ पाटील हे सभापती पदाचे उमेदवार असणार आहेत. देशेकर हे नुकतेच शेकाप पक्षातून भाजपामध्ये आले असल्याने व त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला होता. अनेक उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सेनेच्या गुलशन पाटील यांच्यासाठी ही खेळी असल्याचेही संगितले जाते.शेकापची बहुतांश धुरा ही ग्रामीण मतदारांवर आहे. आजपर्यंत याच मतदारांनी शेकापला पनवेल तालुक्यात सत्ता मिळवून दिली आहे. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यावर अनेक बदल झाले आहेत. पनवेल व आजूबाजूच्या भागात बाहेरील लोकवस्ती वाढल्याने ग्रामीण भागातील शेकापचे वर्चस्व कमी होऊ लागले आहे. त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. शिक्षक मतदार संघातून शेकापचे बाळाराम पाटील विजयी झाल्याने पुन्हा शेकापला फिनिक्स पक्षाप्रमाणे गतवैभव मिळण्याची शक्यता आहे.
महिला मतदारांच्या हाती उमेदवारांचे राजकीय भवितव्य
By admin | Published: February 10, 2017 4:22 AM