मुंबई बाजार समितीचे राजकीय महत्त्व वाढले, सर्वपक्षीय उमेदवारांनी दिल्या भेटी

By नामदेव मोरे | Published: May 15, 2024 05:45 PM2024-05-15T17:45:23+5:302024-05-15T17:46:13+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही बाजार समितीमध्ये रॅली, बैठकांचा धडाका लावून कामगारांसह व्यापाऱ्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

Political importance of mumbai Bazar Committee increased, visits were made by candidates of all parties | मुंबई बाजार समितीचे राजकीय महत्त्व वाढले, सर्वपक्षीय उमेदवारांनी दिल्या भेटी

मुंबई बाजार समितीचे राजकीय महत्त्व वाढले, सर्वपक्षीय उमेदवारांनी दिल्या भेटी

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सातारा, बारामती, शिरूर मतदारसंघांसाठीही येथील मतदारांना साकडे घातले होते. आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही बाजार समितीमध्ये रॅली, बैठकांचा धडाका लावून कामगारांसह व्यापाऱ्यांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

बाजार समितीमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी कामगार, व्यापाऱ्यांकडील मेहता व इतर कर्मचारी, वाहतुकदार, खरेदीदार मिळून रोज १ लाख नागरिकांची येजा असते. मुंबईमधील घाटकोपर, चुनाभट्टी परिसरात येथील धान्य, मसाला व फळ व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. मानखुर्द ते बोरीवलीपर्यंतचे किरकोळ दुकानदार खरेदीसाठी मार्केटमध्ये येत असतात. नवी मुंबईमध्ये वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, तुर्भे ते नेरूळ जुईनगर, सानपाडा परिसरात व्यापारी, कामगारांची वस्ती मोठी आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण, पुणे जिल्ह्यातील भोर, जुन्नर, मंचर परिसरातील कामगार व व्यापारी मार्केटमध्ये कार्यरत आहेत. यामुळे यावर्षी परभणी, सातारा, बारामती व शिरूर मतदारसंघातील उमेदवारांनी बाजार समितीमधील मतदारांसाठी मोर्चेबांधणी केली होती.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील निवडणूक झाल्यानंतर आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी रॅली काढली. माथाडी नेते नरेंद्र पाटील महायुतीचा प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी बाजार समितीमध्ये रॅली काढून येथील विविध घटकांशी चर्चा केली. आ. शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार करत असून, बाजार समितीमधील व्यापारी, कामगार यांचे राजकीय महत्त्व वाढल्याचे दिसत आहे.

साताराचा प्रचार बाजार समिती भोवती
यावर्षी सातारा लोकसभा मतदारसंघाची पूर्ण निवडणूक बाजार समितीच्या मुद्यांवरच लढली गेली. शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर शौचालय व एफएसआय घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना झालेली अटक या मुद्यांवरच सातारा मतदारसंघामध्ये प्रचार केला जात होता. यामुळे निवडणूक लोकसभेची आहे की, बाजार समितीची, अशी चर्चा सातारामध्ये रंगली होती.

Web Title: Political importance of mumbai Bazar Committee increased, visits were made by candidates of all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.