अरूणकुमार मेहत्रे / कळंबोलीआगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकरिता प्रभाग सोयीचे व्हावेत यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडून आहेत. याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेच, तसेच वेगवेगळ्या वावड्या सुध्दा उठवल्या जात असल्याने महापालिका प्रशासनाने अधिक गुप्तता बाळगली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून नैना वगळल्याने साहजिकच क्षेत्रफळ, लोकसंख्या कमी झालेली आहे. या क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाख ९ हजार इतकी लोकसंख्या आहे. ती विचार घेवून तसेच भौगोलिक रचनेच्या आधारे नवीन प्रभाग तयार करण्यात आलेले आहे. ते मंजुरीकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्यामध्ये नेमके काय दडले आहे. हे लवकरच जाहीर होणार आहे. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल परिसरात याच विषयी चर्चा सुरू आहे. पनवेलमध्ये हा भाग तोडून त्या विभागाला जोडला. नवीन पनवेलचे विभाजन करण्यात आले. आसुडगाव कळंबोलीला जोडण्यात आले. खांदा वसाहतीत एकच प्रभाग झाला. कोळखे व तक्का मिळून एक प्रभाग झाला. अशा प्रकारच्या अनेक चर्चा कानावर येवू लागल्या असल्याने प्रभाग रचनेचा अहवाल फुटला अशा प्रकारचे आरोप सुध्दा करण्यात आले. मात्र या फक्त वावड्या, चर्चा असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या सोयीनुसार प्रभाग व्हावेत यासाठी काही राजकीय मंडळींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या मैत्रीचा आधार घेण्याचा प्रयत्न सुध्दा केल्याची चर्चा आहे. परंतु डॉ. शिंदे यांनी तीन ते चार वेळा त्यामध्ये दुरूस्ती केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काटेकोर आणि कडक शिस्तीच्या आयुक्तांमुळे प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या पथकाने कुठेही वाच्यता केलेली नाही. हे काम अतिशय गुप्त व गोपनीय पध्दतीने करण्यात आले आहे. त्यामुळे नेमके प्रभाग कसे असतील याविषयी सर्वांनाच कमालीचे कुतूहल आहे. त्या फक्त चर्चा आहेत, प्रत्यक्षात प्रभाग जाहीर होतील तेव्हाच खरे काय व खोटे काय हे समजेल, असे खांदा वसाहतीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आरक्षण काहीही पडो आपल्याकडे त्याकरिता पर्याय आहेत. महिला झाले तर पत्नी, पुरूष पडले तर आपण, इतर काही आरक्षण निघाले तर मित्र, समर्थकाला उभे करू मात्र प्रभाग सोयीस्कर झाला पाहिजे कारण येथे आपले निवडून येण्यापुरते मत आहेत, असे कळंबोलीतील एका इच्छुकाने सांगितले. तर काही जुन्या जाणत्या माजी नगरसेवकांच्या मते प्रभाग कसाही होवो फरक पडत नाही. मात्र आरक्षण आपल्यानुसार पडले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच सोयीचे आणि सोयीस्कर प्रभाग व्हावेत अशी इच्छा इच्छुकांची आहे.
राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी
By admin | Published: December 22, 2016 6:38 AM