उरणमध्ये राजकीय पक्षांचा लागणार कस
By admin | Published: February 9, 2017 04:52 AM2017-02-09T04:52:02+5:302017-02-09T04:52:02+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय
उरण : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालविली आहे. मागील पाच वर्षांपासून उरण पंचायत समितीवर सत्ता असलेल्या सेनेला या निवडणुकीत वर्चस्व राखणे अवघड जागेचे दुखणं होऊन बसले आहे. उनपच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा फटका बसल्याने स्वबळावर लढणाऱ्या सेनेला दारुण पराभवाला सामोरे जाण्याची पाळी आली होती. उनपच्या निवडणुकीच्या स्थितीप्रमाणेच २१ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जि. प. व पं. स.च्या निवडणुकीतही परिस्थिती कायम असल्याने सत्ता टिकविणे सेनेला इतके सोपे राहिलेले नाही. भाजपानेही स्वबळावर तर शेकाप-काँग्रेस आघाडीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी आणि मनसेला आघाडीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे मनसेने तरी पं. स. च्या दोन जागांवर उमेदवारी अर्जदाखल केले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांबरोबर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत.
रायगड जि. प. च्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जि. प. च्या चार जागांसाठी २६ तर पं. स. च्या ८ जागांसाठी ४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच तिरंगी की बहुरंगी लढती होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. उरण तालुक्यातील राजिप गटात चार तर पं. स. च्या गणात आठ जागा आहेत. चाणजे, चिरनेर, नवघर, जासई या चार जि. प. च्या आणि पंचायत समितीच्या केगाव, चाणजे, नवघर, भेंडखळ, चिरनेर, आवरे, जासई, विंधणे या आठ अशा एकूण १२ जागांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत राजिपच्या चार जागांपैकी शिवसेना १, काँग्रेस २, भाजपा १ असे बलाबल होते. तर पं. स. मध्ये शिवसेना ४, शेकाप २, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी १ अशी संख्या होती. मात्र राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजय भोईर यांच्या सेना प्रवेशानंतर उरण पं. स. वर सेनेचेच वर्चस्व राहिले होते.
या वेळी मात्र सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे सेनेला उरण पं. स.वरील वर्चस्व राखणे अवघड होवून बसले आहे. सेना भाजपाची युती तुटल्याने भाजपाने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. (वार्ताहर)