अधिकाऱ्यांना राजकारण्यांची भीती
By admin | Published: November 18, 2015 01:19 AM2015-11-18T01:19:23+5:302015-11-18T01:19:23+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बेकायदेशीर होर्डिंगबाजी सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करत नाहीत
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बेकायदेशीर होर्डिंगबाजी सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करत नाहीत. नेत्यांचा प्रसिद्धीचा उद्देश सफल झाल्यानंतर स्वखर्चाने रोज हजारो रूपये खर्च करून होर्डिंग काढले जात आहेत.
दिवाळीमध्ये महापालिकेच्या १११ प्रभागांमध्ये २ हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग लावले होते. उच्च न्यायालयाने विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पालिकेचे विभाग अधिकारी राजकीय पदाधिकाऱ्यांना घाबरत असल्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. अनधिकृत होर्डिंग काढल्यास नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून दबाव येत आहे. या दबावाचे कारण देत प्रशासन कारवाई टाळत आहे. अतिक्रमण विरोधी पथकामधील कर्मचारीही नगरसेवक व राजकीय पक्षांशी जवळीक असणारे असल्यामुळे ते सण, उत्सव व वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग काढत नाहीत. दबदबा असणाऱ्या नेत्यांच्या होर्डिंगला हातही लावला जात नसून सामान्य कार्यकर्त्यांचे होर्डिंग हटविले जात आहेत.
अनधिकृत होर्डिंगविरोधात तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. उच्च न्यायालयाचा अवमान झाला तरी चालेल परंतु लोकप्रतिनिधींचा कोप नको अशी भावना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. होर्डिंग लावल्यानंतर कारवाई होत नाही. परंतु नेत्यांचा प्रसिद्धीचा उद्देश साध्य झाल्यानंतर पालिका स्वखर्चाने सर्व होर्डिंग काढून घेवून जात आहे.
यासाठी रोज हजारो रूपये खर्च केले जात असून याविषयी दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)