नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. नागरिक त्रस्त असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मात्र मौन धारण केले आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विविध कंत्राटे घेतली असल्यामुळेच सर्वांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. सिडकोने २०१३ मध्ये सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामास सुरुवात केली आहे. हार्बर मार्गावरील सर्वात भव्य इमारत उभारली जात आहे. परंतु सदर बांधकाम करताना प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी ठेकेदाराने घेणे आवश्यक आहे. परंतु काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याचा कालावधी वगळता या परिसरात नियमित धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. धुळीतून वाहने गेल्यानंतर नागरिकांना श्वासही निट घेता येत नाही. याविषयी नागरिकांनी आवाज उठविला की ठेकेदाराकडून रोडवर पाणी मारले जाते. परंतु काही दिवसांनी पुन्हा दुर्लक्ष केले जाते. महापालिकेच्या पावसाळी गटारामध्ये पाणी सोडले जात असून त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांसाठी प्रसाधनगृहाचीही व्यवस्थित सोय नाही. दारावेगावाकडील प्रसाधनगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचा मार्गही गैरसोयीचा आहे. अपंग नागरिकांना रेल्वे स्टेशनमध्ये ये-जा करताना खूपच त्रास होत आहे. रेल्वे स्टेशनचे व व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. डेंग्यूमुळे एक तरुणाचा मृत्यूही झाला आहे. या समस्येकडे सर्वच राजकीय पक्षांचे पदाघिकारी दुर्लक्ष करू लागले आहेत. (प्रतिनिधी)
सीवूडच्या प्रदूषणावर राजकारण्यांचे मौन
By admin | Published: November 15, 2015 12:02 AM