पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
By Admin | Published: January 10, 2016 12:45 AM2016-01-10T00:45:36+5:302016-01-10T00:45:36+5:30
नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार असल्याने नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान होत आहे. राजकीयदृष्ट्या या निवडणुकीला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादीने शिल्पा कांबळे , भाजपाने सरस्वती पाटील व काँगे्रसने नूतन राऊत यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीला नवी मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दाखविण्यासाठी ही जागा जिंकावी लागणार आहे. शिवसेना - भाजपाने राष्ट्रवादीकडून महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एक जागेमुळे सत्तापरिवर्तन होणार नाही, परंतु राष्ट्रवादीच्या दिघामधील चार व इतर ठिकाणच्या काही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशा स्थितीमध्ये युतीसाठी एक जागाही महत्त्वाची ठरणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे, विजय नाहटा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागात तळ ठोकला होता.
सुरुवातीला पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. परंतु सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे पूर्ण शहरवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. एक प्रभागाच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्यामुळेही शहरातील पक्षाचे सर्व कार्यकर्तेही येथे तळ ठोकून होते. शेवटच्या दिवशी परिसरात पैसे वाटपाची जोरदार चर्चा होती. मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याचे मेसेज व्हॉट्सअॅपवरून फिरू लागले होते. यामुळे पोलिसांनीही कडक बंदोबस्त लावला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, दोन तासांनंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
रात्री ८ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जल्लोषाची तयारीही सुरू केली आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नेरूळ प्रभाग ८८ मध्ये रविवारी पोट निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व्हावी, याकरिता पोलिसांतर्फे रूट मार्चदेखील काढण्यात आला. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी सेंट झेवियर्स शाळेत होणार असल्याने या केंद्रापासून १०० मीटरवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.