उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींत ७० जागांवर मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:32 AM2021-01-15T00:32:57+5:302021-01-15T00:33:16+5:30
उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली आदी चार ग्रामपंचायती येत आहेत.
मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या ७० जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात १६६ उमेदवार आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपविरोधात महाआघाडीच्या उमेदवारांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान साहित्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली आदी चार ग्रामपंचायती येत आहेत. या चार ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी पोलीस निरीक्षक-२, अधिकारी-१४ आणि कर्मचारी- ८४ असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याअंतर्गत फुंडे या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक-२, अधिकारी-३ आणि कर्मचारी- १६ असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केगाव या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक-१, अधिकारी-३ आणि कर्मचारी-२५ असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपन शिंदे यांनी दिली.
मतदान केंद्रावर कोविडचा फैलाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सामाजिक अंतरासह मास्क व इतर आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मतदारांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांची गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतनिहाय मतमोजणीसाठीही सहा टेबल लावण्यात येणार आहेत.
- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण
ग्रामपंचायतींची संख्या ६
प्रभाग २५
उमेदवार ७०
एकूण मतदार ३१३०१
पुरुष १५६१५
स्त्रिया १५६८८
इतर ०१
एकूण मतदान केंद्र ४३