पनवेल : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी रिंगणात असलेल्या ६२ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले असून, तालुक्यात शांततेत सरासरी ८० टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर झालेले किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याने आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पनवेलमध्ये सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागून होत्या. त्यामुळे येथे उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. या निवडणुकीने ग्रामीण भागात प्रचंड उत्साह दिसून आला. पनवेलमधून जिल्हा परिषदेच्या आठ गणांसाठी व पंचायत समितीच्या १६ गणांसाठी शांततेत मतदान पार पडले. या वेळी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आल्याने मतदानात वाढ झाली. वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, गुळसुंदे, वडघर, गव्हाण, केळवणे हे जिल्हा परिषद गण, तर वावंजे, चिंध्रण, नेरे, आदई, पाली देवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, गुळसुंदे, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे,आपटा या पंचायत समितीच्या गणांमध्ये २२० केंद्रावर मतदान घेण्यात आले. यासाठी २००हून अधिक पोलीस, तर १५००हून जास्त सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संपूर्ण पनवेल तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी दिली.
पनवेलमध्ये शांततेत मतदान
By admin | Published: February 22, 2017 6:49 AM