उरण तालुक्यात शांततेत मतदान
By admin | Published: February 22, 2017 06:46 AM2017-02-22T06:46:11+5:302017-02-22T06:46:11+5:30
तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी दुपारी
उरण : तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ४३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे.
उरण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची सर्वत्रच सकाळपासूनच धामधूम सुरू झाली होती. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, उमेदवार आणि त्यांचे समर्थक सकाळपासूनच कामाला लागले होते. मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर सर्वत्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लगबग सुरू झाली होती. सकाळपासून मतदानाला झालेली गर्दी दुपारी १ वाजल्यानंतर ओसरल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर मतदानाचा जोर वाढला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५५,०९५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये २८,३४० स्त्री आणि २६,७५५ पुरुष मतदारांचा समावेश होता. दुपारपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले होते. शेवटची आकडेवारी हाती आली नसली तरी मतदानाचा टक्का ६५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.