नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये शांततेमध्ये मतदान पार पडले. मशिन बंद पडण्याच्या व बोगस मतदानाच्या किरकोळ तक्रारी वगळता कोणताही गैरप्रकार झाला नाही. तीव्र उकाडा व गावी गेलेले मतदार परत न आल्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रशासनासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले.
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील दोन विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. प्रमुख उमेदवार ठाणे शहरामधील असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच या परिसरामध्ये उत्साह दिसला नाही. गावाकडील निवडणूक, लग्नाच्या तिथी व उन्हाळी सुट्ट्यांमुळे हजारो चाकरमानी गावी गेल्यामुळे मतदानामध्ये उत्साह दिसलाच नाही. पहिल्या दोन तासांमध्ये फक्त ६ टक्के मतदान होऊ शकले होते. दुपारी एक वाजेपर्यंत हे प्रमाण २६ टक्के एवढेच होते. मतदान केंद्रावर कुठेच मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नव्हते. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी धावपळ सुरू होती. सोशल मीडियावरून व प्रत्यक्ष फोन करूनही नागरिकांना मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात होते; परंतु अनेक जण शहरामध्येच नसल्यामुळे मतदानाचे प्रमाण फारसे वाढू शकले नाही.
नवी मुंबईमध्ये दिवसभर शांततेमध्ये मतदान पार पडले. कुठेही मारामारी किंवा इतर गैरप्रकार झाले नाहीत. तुर्भे नाक्यावरील हनुमाननगर व इतर ठिकाणी मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या; परंतु तत्काळ ही समस्या सोडविण्यात आली. मतदान केंद्रावर व इतर ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सिडको विकसित नोडपेक्षा झोपडपट्टी परिसरामध्ये मतदानासाठी उत्साह चांगला होता.
एकीकडे सूर्य आग ओकत असताना सोमवारी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उत्साहात मतदान पार पडले. पनवेल विधानसभा क्षेत्रात ५५.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. काही ठिकाणी मशिनमधील किरकोळ बिघाड पाहता इतरत्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ पनवेल मतदार आहे. या मतदार संघात ५ लाख ३९ हजार १८७ मतदार संख्या आहे. या व्यतिरिक्त १७० सर्व्हिस व्होटर्स (मतदार) आहेत. याठिकाणी मूळ मतदान केंद्र ५६३ आणि सहायक मतदान केंद्र २१ असे मिळून एकूण ५८४ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच याप्रमाणे २९२० कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. काही मतदार केंद्रावर सेल्फी पॉइंटदेखील निवडणूक आयोगामार्फत उभारण्यात आले होते. खारघर शहरातील सेक्टर ८ मधील रेडक्लिफ शाळेत सजावट करण्यात आली होती. मतदारांसाठी सेल्फी पॉइंट, तसेच स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.