जॉगिंग ट्रॅकवर एसीचे प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:08 PM2019-08-25T23:08:22+5:302019-08-25T23:08:30+5:30
घणसोलीतील प्रकार : अतिक्रमण विरोधी पथकाची डोळेझाक
नवी मुंबई : पालिकेने बनवलेल्या जॉगिंग ट्रॅकवरच एसीची आउटडोअर युनिट बसवण्यात आली आहेत, यामुळे जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्यांना तिथल्या दूषित हवेला सामोरे जावे लागत आहे, तर सोसायटीच्या भिंतीमधून सार्वजनिक जागेवर बसवलेल्या या एसीच्या युनिटवर कारवाई करण्याकडे अतिक्रमण विरोधी पथकाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पालिकेने घणसोली येथे कोट्यवधी रुपये खर्चून सेंट्रल पार्क उभारले आहे. या पार्कच्या भोवती नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. सदर पार्कचे अद्याप उद्घाटन झालेले नसले, तरीही जॉगिंग ट्रॅकचा मात्र नागरिकांकडून वापर सुरू झाला आहे. सकाळ-संध्याकाळ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या जॉगिंग ट्रॅकभोवती पालिकेने आकर्षक हिरवळही तयार केली आहे. अशातच जॉगिंग ट्रॅकचा शोभा घालवणारा, तसेच फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना तिथले एसीचे युनिट त्रासदायक ठरू लागले आहेत. पार्कच्या प्रवेशद्वाराच्याच बाजूला असलेल्या रहिवासी सोसायटीत मागच्या बाजूस एसीचे आउटडोअर युनिट बसवण्यात आले आहेत, तर काही हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या स्वयंपाक खोलीच्या धुरांडीची तोंडेही जॉगिंग ट्रॅकच्या दिशेनेच केली आहेत. यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनी तसेच वायुप्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे, पार्कमध्ये ज्या बाजूला तरणतलाव बनवलेला आहे, त्यापासून काही अंतरावरच जॉगिंग ट्रॅकवर हा प्रकार पाहायला मिळत आहे.
परिणामी, एसी व धुरांडी यातून निघणाºया दूषित हवेचा त्रास तिथे येणाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. जॉगिंग ट्रॅकला लागूनच असलेल्या भिंतीवर रहिवासी सोसायट्यांमधील वाढीव बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक बनवताना ही अतिक्रमणे असतानाही त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर संपूर्ण प्रकारावरून जॉगिंग ट्रॅक बनवताना पालिकेचेही नियोजन फसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पालिकेने घणसोलीत सेंट्रल पार्कच्या बाहेर बनवलेला जॉगिंग ट्रॅक नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. मात्र, काही ठिकाणी रहिवासी सोसायट्यांच्या एसीचे आउटडोअर युनिट जॉगिंग ट्रॅकच्या भिंतीवर बसवण्यात आले आहेत. त्यामधून निघणारी गरम हवा व दूषित वायूचा त्रास जॉगिंगसाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याकडे पालिकेने लक्ष देऊन ते हटवण्याची गरज आहे.
- अभिजीत पाटील, स्थानिक नागरिक