पनवेल परिसरात प्रदूषण; उग्र वासाने नागरिक त्रस्त; शासनाच्या नियंत्रणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:21 PM2020-11-07T23:21:01+5:302020-11-07T23:21:21+5:30
कळंबोली, खारघर,कामोठे, तळोजात धुरकट वातावरण; आरोग्य धोक्यात
-वैभव गायकर
पनवेल : नजीकच्या काळात पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात दूषित उग्र वासाचे प्रदूषण वाढत चालले आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा या परिसरासह हा उग्र दर्प खांदा कॉलनी, नवीन पनवेलपर्यंत पोहोचला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
तळोजा एमआयडीसीमधील दूषित प्रक्रिया न झालेले पाणी कासाडी नदीमार्गे कोपरा खाडीत सोडले जाते. या दूषित पाण्यावर योग्यरीत्या प्रक्रिया न झाल्याने, या पाण्याचा दर्प या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेला हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार जडण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी हा त्रास वाढल्याने २० पेक्षा संघटना एकत्र आल्या होत्या. खारघर फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली होती. प्रदूषणाचा वाढत चाललेला त्रास लक्षात घेता, कायदेशीर लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला होता.
या आंदोलनाचा भाग म्हणूनच सुमारे ५२ फुटी प्रदूषणरूपी राक्षस दहनाचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय अतिशय गंभीर बनत चालला आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषणाच्या विषयावरून राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वारंवार प्रदूषणकारी कारखान्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश दिले आहेत. काही कारखान्यांना क्लोजर नोटीसही बजावण्यात आलेल्या असताना प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत चालला असल्याने पनवेल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.