- अरुणकुमार मेहेत्रेकळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील तलावांची परिस्थिती खूपच बिकट आहे. तलावांची देखभाल, माहिती फलक, कठडे व्यवस्थित नसल्याने अपघातात भर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी देवाळे तलावातील पाण्यात १२ वर्षांचा मुलगा पडून मृत्यू झाल्याने महापालिकेचा दुर्लक्षितपणा उघड झाला आहे. याशिवाय इतर तलावात लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने हे जलाशय मृत्यूचा सापळाच बनत चालले आहेत. याबाबत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची व तलाव व्हिजन राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.पनवेल शहर तसेच सिडको वसाहतीत तलावांची संख्या मोठी आहे. मात्र सध्या जलशयामध्ये कचरा साचला आहे. याठिकाणी धोकादायक कठडे, आतमध्ये उतरण्यास मज्जाव करण्याकरिता नसलेली सोय याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. गणेश विसर्जनासाठीच या तलावाकडे पाहिले जाते. तर उर्वरित दिवसांत या तलावांची आठवणही येत नाही.सिडको वसाहतीतील तलावांचीही परिस्थिती वेगळी नाही. तलावांची देखभाल होत नसल्याने लहान मुलांचे मृत्यू झाले आहेत. बुधवारी देवाळे तलावात १२ वर्षांच्या आयान या मुलाचा बळी गेला. तसेच गतवर्षी आदई तलावात दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. कामोठेत सेक्टर ६-ए येथील तलावात १ मे रोजी कार धुण्यासाठी आणलेली कार बुडाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दोन वर्षांपूर्वी याच तलावात दोन शाळकरी मुले बुडाली होती. त्याचबरोबर कामोठेत ८ मार्च २०१६ रोजी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.
पनवेलमध्ये तलाव बनले मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:40 AM