नवी मुंबई : पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घणसोली आणि गोठीवली गावातील विहिरीची अवस्था गंभीर झाली आहे. दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्याच्या वासामुळे या गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नवी मुंबईत बेलापूर ते दिघा या एकूण आठ विभागांच्या कार्यक्षेत्रात एकूण ९४ विहिरी आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींच्या साफसफाई, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने, संपूर्ण विहिरींना शेवाळ आणि पानफुटी, तसेच लहान मोठ्या फांद्यांनी विळखा घातलेला आहे. गोठीवली गावच्या विहिरीच्या समस्यांसंदर्भात समाजसेवक दीपक म्हात्रे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.
सोमवारी ता.२८ डिसेंबर रोजी पालिकेच्या रबाले नागरी आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी विहिरींची पाहणी केली. त्याचप्रमाणे, घणसोली बौद्धवाडी येथील तीन बावडी, गुणाले तलावाच्या मध्यभागी असलेली विहीर आणि घणसोली (चिंचआळी ) येथे असलेल्या विहिरींची पार दुर्दशा झालेली आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात असूनही, पाणीपुरवठा विभाग विहिरीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, परिमंडळ २चे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आठवडाभर सुट्टीवर असल्याचे सांगितले.