वापराविना घणसोलीच्या सेंट्रल पार्कची दुरवस्था; नागरिकांमध्ये खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:00 AM2020-12-01T00:00:47+5:302020-12-01T00:01:00+5:30
वापराविना खेळण्यांना चढला गंज; झुडपे वाढली
नवी मुंबई : उद्घाटन होऊनही कोरोनामुळे वापरासाठी बंद असलेल्या सेंट्रल पार्कची दयनीय अवस्था झाली आहे. पार्कमध्ये गवताच्या ठिकाणी झुडपे वाढली असून, खेळणीही गंज पकडू लागली आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच अडचणीत सापडत आलेल्या सेंट्रल पार्कच्या अवस्थेबाबत नागरिकांमध्ये खंत व्यक्त होत आहे.
पालिकेच्या वतीने सुमारे सतरा कोटी रुपये खर्चून घणसोली येथे सेंट्रल पार्क उभारण्यात आले आहे. सन २०१४ मध्ये ठेकेदाराला काम दिल्यानंतर प्रत्यक्षात एक वर्षभर त्या ठिकाणी काम सुरू होऊ शकले नव्हते. त्यानंतरही पार्कच्या कामात अनेक विघ्ने येतच होती. त्यातूनही मार्ग काढत दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात पार्कचे काम पूर्ण झाले. मात्र, वर्षभर रखडलेले उद्घाटन ऐन कोरोना काळात मार्च महिन्यात घाईमध्ये उरकण्यात आले. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील उद्याने वापरासाठी बंद केल्याने उद्घाटन होऊनही नागरिकांना सेंट्रल पार्कमध्ये पाऊल ठेवता आले नाही.
परिणामी, मागील आठ महिन्यांपासून या पार्कची देखभाल दुरुस्तीही झालेली नाही. ३९१३५.७१ चौ.मी.क्षेत्रफळाच्या भूखंडावर हे पार्क विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये वायू, भूमी, अग्नी, जल व आकाश ही निसर्गातील पंचतत्त्वांची संकल्पना अत्याधुनिक पद्धतीने साकारण्यात आली आहे. मात्र, पार्कच्या वापराविना सर्व संकल्पना धुळीस मिळाल्या आहेत. पार्टी लॉनच्या ठिकाणी मोठमोठी झुडपे वाढली आहेत, तर इतर काही ठिकाणची झाडे जळून गेली आहेत.