नवी मुंबई : मुलांना खेळण्यासाठी, तसेच आबाल-वृद्धांना बसण्यासाठी एखादे उद्यान हवे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बांधलेल्या रणादेवी माता या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. या उद्यानात असलेल्या चारही खांबांवरील आठ हायमस्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे काळोख्या रात्रीचा गैरफायदा रात्रीच्या वेळी दारू, चरस आणि गर्दुल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना येथून जाताना शरमेने मान खाली घालून जावे लागत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या उद्यानात सुरक्षारक्षक नसल्यामुळे त्या ठिकाणी गर्दुले आणि तळीरामांचा सुळसुळाट सुरू आहे.
घणसोली डीमार्टच्या समोरील महापालिकेच्या जिजामातानगर येथील उच्चस्तरीय आणि भूमिगत जलकुंभ आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलकुंभाच्या आवारात मोठ्या प्रमाणात केर कचऱ्याचे ढिगारे साचले असून, ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. सायंकाळी याच ठिकाणी कचरा जाळून टाकण्यात येत असल्यामुळे त्याचा धूर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
महापालिकेने उद्यान आणि प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता असल्याची मागणी घणसोली येथील समाजसेवक गणेश सकपाळ यांनी केली आहे. प्रत्येक उद्यानांना सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम ठेकेदाराचे असूनही ५० टक्के उद्यानात सुरक्षारक्षकच नसल्याने उद्यानाची पार दुर्दशा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.