रेल्वे स्थानकांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:00 AM2018-08-06T02:00:27+5:302018-08-06T02:00:32+5:30
आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांची नियमित देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली आहे.
- अनंत पाटील
नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांची नियमित देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली आहे. बहुतांशी स्थानकांच्या परिसरात डेब्रिज व कचºयाचे ढीग साठले आहेत. स्थानकाच्या भिंतीला तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छताला गळती लागली आहे. त्याचबरोबर स्थानक आणि परिसरात मद्यपी व गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. तसेच तृतीयपंथीय आणि भिकाºयांचाही उपद्रव वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको, महापालिका, कोकण भवन, पोलीस आयुक्तालय आणि वाशी न्यायालय या सारख्या महत्त्वाच्या कार्यालयात जाण्यासाठी बेलापूर स्टेशनला उतरून जावे लागते. बेलापूर स्टेशनवरून सिडकोच्या दिशेला उतरल्यानंतर तिकीट खिडकीजवळ असलेल्या कुलरचे पाणी नियमितपणे खाली वाहत असते, त्यामुळे प्रवाशांना चालताना कसरत करावी लागते.
अपंग व वृद्ध प्रवाशांचा पाय घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थानकाच्या आतील आणि बाहेरील भिंतींचे प्लास्टर निघालेले आहे. छताला ठिकठिकाणी गळती लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
नेरुळ स्थानकात भिकाºयांची मोठी वर्दळ आहे. आवारात डेब्रिज आणि मातीच्या भरावाबरोबरच भंगार लाकडाचे साहित्य पडलेले आहे. भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर दिसून येतो. भिंतींच्या लाद्या व प्लास्टर निखळले आहे. फलाट क्रमांक १ वरून बाहेर जाण्याच्या दिशेने जिन्याजवळील दरवाजा मागील अनेक महिन्यापासून उघडा आहे. या दरवाजाचे गूढ प्रवाशांना सतावत आहे. कारण यात भिकाºयांचा तळ दिसून येतो. भिकाºयांच्या वास्तव्यामुळे या खोलीत कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. स्थानकातील समस्यांबरोबरच आवारातही अनेक समस्या दिसून येतात. पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे.
जुईनगर स्थानक तर समस्यांचे माहेरघर म्हणून नावारूपाला येत आहे. या स्थानक परिसरात देहविक्रय करणाºया महिला व तृतीयपंथीयांचा मुक्त वावर दिसून येतो. सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत या महिलांचा अक्षरश: धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होत आहे. फेरीवाले आणि भिकाºयांचाही स्थानकासह परिसरात उपद्रव वाढला आहे. चक्क स्थानकात दुचाकी वाहने उभी केली जातात. तसेच स्थानकांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. विद्युत केबल्स उघड्या पडल्या आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानकातंल तिकीट वेडिंग मशिन अनेक दिवसांपासून बंद आहेत. इंडिकेटर्सही नादुरुस्त आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकूणच सायबर सिटीतील आधुनिक स्थानकांची नियमित डागडुजीअभावी दुरवस्था झाली आहे, त्याचा फटका प्रवशांना बसला आहे. त्यामुळे या स्थानकांची तातडीने दुरुस्ती करून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
बहुतांशी स्थानकांत अपुरी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे फावले आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी स्थानकांत पोलीस बळ वाढविण्याची गरज आहे.
- समाधान विष्णू मेंढे, रेल्वे प्रवासी, नवी मुंबई.