गरीब विद्यार्थ्यांचा अर्थसंकल्प कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:09 AM2018-02-22T02:09:31+5:302018-02-22T02:09:33+5:30

महापालिकेने २०१७ - १८ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातील २९८७ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य केले. मार्चपर्यंत १५०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले;

Poor students budget on budget | गरीब विद्यार्थ्यांचा अर्थसंकल्प कागदावरच

गरीब विद्यार्थ्यांचा अर्थसंकल्प कागदावरच

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : महापालिकेने २०१७ - १८ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातील २९८७ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य केले. मार्चपर्यंत १५०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात यामध्ये मनपा शाळेत शिक्षण घेणाºया गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याला फक्त निराशा आली आहे. विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, माध्यमिकची सहल, बूट, गणवेश, क्रीडा साहित्य व शाळांचा दर्जा सुधारण्यावर एक रुपयाही खर्च होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सर्व महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे; परंतु नवी मुंबई मनपा शाळांमधील पटसंख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. राज्यातील इतर शहरात शाळा बंद पडत असताना नवी मुंबईत नवीन शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. मनपा शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा व शालेय परीक्षांमध्येही नावलौकिक मिळवत आहेत; परंतु दोन वर्षांपासून प्रशासकीय अवकृपेमुळे गरीब विद्यार्थ्यांवरही अन्याय होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. पालिका प्रशासनाने गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये ८० कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद केली होती. यामधील वेतन व देखभाल दुरुस्तीच्या कामांवर खर्च झाले; पण विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांवर खर्च करण्यामध्ये मात्र कंजुषी करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सण, शिक्षक दिन व स्नेहसंमेलनासाठी १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली होती; पण नोव्हेंबरपर्यंत त्यामधील १ लाख ८२ हजार रुपयेच खर्च केले आहेत. वह्या पुस्तके, स्वाध्याय पुस्तके व इतर साहित्य खरेदीसाठी १ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद होती. प्रत्यक्षात त्यामधील आठ महिन्यांत ३६ लाख रुपयेच खर्च झाले आहेत. रेनकोट खरेदीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली होती; परंतु यामधील एक रुपयाही खर्च केलेला नाही.
गरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण मोफत घेता यावे यासाठी पालिकेने प्रत्येक नोडमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. या विद्यार्थ्यांवरही प्रशासनाने अन्याय केला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात विद्यार्थी सहलीसाठी ५ लाखांची तरतूद केली होती; पण एक रुपयाही खर्च केलेला नाही. अपघात विमा योजनेसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे; पण आठ महिन्यांत काहीच खर्च नाही व मार्चपर्यंत २ लाख खर्च होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संगणक शिक्षकावर ४६ लाखांची तरतूद असताना आठ महिन्यांत काहीच खर्च नाही. विद्यार्थ्यांना गणवेश, क्रीडा साहित्य, बूट, मोजे यासाठीही काहीच खर्च झालेला नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांवर खर्च न करणाºया प्रशासनाला स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी जाब विचारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गणवेश, दप्तरही नाही
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात अपयश आले आहे. फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये ठेकेदाराने विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य पुरविले. त्या वेळी हे साहित्य मोफत असल्याचे भासविले होते. पण जूनपासून विद्यार्थ्यांना व पालकांना बळजबरी करून त्यांच्याकडून शैक्षणिक साहित्य मिळाल्याचे पैसे ठेकेदाराला कसे मिळतील यासाठी धडपड सुरू असून यावरून शिक्षण विभागाची प्रतिमाही मलिन होऊ लागली आहे.

ई-लर्निंग बंदच
महापालिकेच्या शाळेमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून ई-लर्निंग वर्ग चालविले जात होते. संगणक शिक्षणही देण्यात येत होते; परंतु जवळपास दोन वर्षांपासून हा ठेका रद्द करण्यात आला आहे. गतवर्षी ई-लर्निंगसाठी तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे; परंतु नोव्हेंबरपर्यंत एक रुपयाही खर्च केलेला नाही. मार्चपर्यंत मात्र पूर्ण रक्कम खर्च करण्यात येईल असे अर्थसंकल्पात दाखविले आहे. एक महिन्यात दहा कोटी कसे खर्च करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गरीब विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. '

अग्निशमन यंत्रणाही नाही
महापालिका शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा निर्माण करण्यासाठी ७ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; परंतु नोव्हेंबरपर्यंत एक रुपयाही खर्च झालेला नाही.
मार्चअखेरपर्यंत सर्व रक्कम खर्च केली जाणार आहे. प्रत्यक्षात शिक्षकांशी संपर्क साधला असता शाळांमध्ये फक्त फायर इस्टिंगविशर किट असून त्यामधील अनेकांची वापराची तारीख संपलेली आहे. त्या उपकरणांचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात आलेले नाही.

Web Title: Poor students budget on budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.