गरीब विद्यार्थ्यांना आयुक्तांनी वेठीस धरले
By admin | Published: February 4, 2017 03:44 AM2017-02-04T03:44:27+5:302017-02-04T03:44:27+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बहुजन, कष्टकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याविरोधात वैयक्तिक
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बहुजन, कष्टकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याविरोधात वैयक्तिक स्तरावर उतरून त्रास दिला जात आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही शहरवासीयांना त्रास देण्यासाठी शासनाने त्यांना येथे ठेवले असून त्यांच्याविरोधात विद्यार्थी, पालकांना घेवून भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिला आहे.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेवून आयुक्तांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. शहरात ८ महिन्यांपासून लोकशाही पायदळी तुडविली जात आहे. लोकशाही मूल्यांना तिलांजली देवून कामकाज सुरू आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणारांना वैयक्तिक स्तरावर जावून त्रास देण्याचा व आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचा गवगवा करून शैक्षणिक साहित्याचा ठेका रद्द केला. नंतर कमी पैशात साहित्य देण्याचा बहाणा केला, पण वर्षभरात साहित्य दिले नाही.आॅडिओ व्हिज्युअल व संगणक शिक्षणाचे काम थांबविले. जाणीवपूर्वक गरीब विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे. १५ दिवसांमध्ये शिक्षक आणतो अशी घोषणा केली होती, पण अद्याप शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. जे ठोक मानधनावर शिक्षक होते त्यांना कमी करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयात जावून त्यांनी स्थगिती मिळविली व विनावेतन शिक्षणाचे काम करत आहेत. उपाशी माणूस मुलांना कसा शिकविणार. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करा असे सांगूनही ऐकले जात नाही. मुद्दाम बदल्या करून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे.
आयुक्तांनी गरीब मुलांच्या शिक्षणाची खेळ सुरू केल्याने त्यांच्या विरोधात पालकांना घेवून भीक मांगो आंदोलन करण्याचा इशाराही सोनावणे यांनी दिला आहे. महापालिकेतील १११ पैकी १०५ नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतरही राज्य शासनाने अद्याप त्यांची बदली केलेली नाही. नवी मुंबईकरांना त्रास देण्यासाठीच त्यांना येथे ठेवले जात असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आता आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. रबाळेमध्ये राजश्री शाहू महाराज विद्यालय व हिंदी माध्यमाच्या शाळा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. पण तेथील मुख्याध्यापकांची मुद्दाम बदली करण्यात आली. जाणीवपूर्वक शुक्रवारी आदेश जारी केले जातात. जेणेकरून न्यायालयात जावून दाद मागता येवू नये. अशाप्रकारे काम करून त्रास देण्याचे प्रकार थांबविले जावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.
महापौरांनी केलेले आरोप
- आयुक्तांकडून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत
- बहुजन, कष्टकरी विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले
- आयुक्तांविरोधात आवाज उठविणाऱ्यांना वैयक्तिक स्तरावर जावून त्रास
- परीक्षा संपण्यापूर्वीच शिक्षकांच्या केल्या बदल्या
- डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास विरोध
- विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या उपलब्ध करून देण्यात अपयश