पोर्तुगालच्या दूतांनी केली तळोजा तुरुंगाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:05 AM2018-06-13T06:05:30+5:302018-06-13T06:05:30+5:30
कुख्यात गुंड अबू सालेम तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार त्याने केली होती.
पनवेल - कुख्यात गुंड अबू सालेम तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानुसार पोर्तुगाल येथील दूतावासाचे दोन प्रतिनिधी मंगळवारी तळोजा येथील कारागृहात आले होते. अडीच ते तीन तास त्यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या वेळी त्यांच्या सोबत वकील सबा कुरेशी उपस्थित होत्या.
कुरेशी यांनी सांगितले की, सालेमला तुरुंगात मानसिक त्रास दिला जात असून कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही. यापूर्वी त्याच्यावर आर्थर जेलमध्ये हल्ला झाला होता. त्यामुळे आणखी हल्ला होण्याची तक्रारही त्याने केली होती. तळोजा तुरुंगात त्याला कशा प्रकारे ठेवले आहे, याची पाहणी करण्यासाठी पोर्तुगाल दूतावासाचे प्रतिनिधी आले असल्याचे त्यांनी सांगितले. सालेमची तुरुंगातील व्यवस्था, त्याच्यावर हल्ला कसा झाला होता, तेथील वातावरण कसे आहे? याची माहिती या प्रतिनिधींनी घेतली. त्यानुसार ते आपला अहवाल पोर्तुगाल सरकारला सादर करणार असल्याची माहिती कुरेशी यांनी दिली.