अपंगांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
By admin | Published: June 29, 2017 02:57 AM2017-06-29T02:57:50+5:302017-06-29T02:57:50+5:30
पनवेल महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांबाबत व अतिक्रमण हटाव मोहिमेमधून अपंग व्यावसायिकांना कायमस्वरूपी वगळून
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेमध्ये अपंगांच्या विविध मागण्यांबाबत व अतिक्रमण हटाव मोहिमेमधून अपंग व्यावसायिकांना कायमस्वरूपी वगळून, स्टॉल तोडल्याबाबतच्या चर्चेसाठी अमरावतीचे आमदार बच्चू कडू पनवेलला आले होते. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली व अपंग निधीचे वाटप करून देणार असल्याचे मान्य केले असल्याची माहिती, रवींद्र खोत यांनी दिली. तसेच मार्केटमध्ये अपंगांनी स्टॉल लावावेत, असेदेखील आयुक्तांनी आमदार कडू यांना सांगितले.
पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये अपंगांचा तीन टक्के निधी राखीव ठेवून, तो अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात यावा व या मागील वर्षाचा निधीचा बॅकलॉग भरून काढावा, जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणे अपंगांची महानगरपालिकेमध्ये नोंद करणे, १९९५चा अपंग व्यक्ती कायदा राबविणे, भूखंड निवासी व व्यापारी गाळेवाटपामध्ये कायद्याप्रमाणे १९९६ पासूनचा अनुशेष तीन टक्केप्रमाणे भरून काढावा. अपंगांना व्यवसायासाठी बांधीव स्टॉल व जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अपंगांची तीन टक्केप्रमाणे नोकरभरती करण्यात यावी, निधीचे नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करून त्यामध्ये अपंगांना स्थान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टमंडळ व आयुक्त शिंदे यांची चर्चा झाली.